अल्पवयीन मुलांनी केला गुंडाचा खून
By admin | Published: November 2, 2015 03:09 AM2015-11-02T03:09:39+5:302015-11-02T03:09:39+5:30
दारू व सिगारेटसाठी त्रास देणाऱ्या एका तडीपार गुंडाचा त्याच्याच दोन अल्पवयीन साथीदारांनी खून केला. शनिवारी मध्यरात्री गिट्टीखदान परिसरातील पंचशील नगर येथे ही घटना घडली.
नागपूर : दारू व सिगारेटसाठी त्रास देणाऱ्या एका तडीपार गुंडाचा त्याच्याच दोन अल्पवयीन साथीदारांनी खून केला. शनिवारी मध्यरात्री गिट्टीखदान परिसरातील पंचशील नगर येथे ही घटना घडली. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. रोहित गुणवंत सोनेकर (२३) रा. अजनी असे मृत तडीपार गुंडाचे नाव आहे. त्याला अजनी पोलिसांनी दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले होते.
तडीपार झाल्यापासून रोहित गिट्टीखदान चौकातील पंचशीलनगर येथे राहात होता. वस्तीतील १७ वर्षीय आरोपीशी आणि त्याच्या मित्राशी त्याची ओळख झाली. रोहित स्वत:चा गुन्हेगारी रेकॉर्ड सांगून वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करायचा. दारू व सिगारेटसाठी पैसे मागायचा. काही दिवस दोघांनी रोहितचे ऐकले. रोहित त्यांना मारहाणसुद्धा करू लागला. या त्रासाला दोघेही कंटाळले होते.
शनिवारी सायंकाळी ६ वाजता रोहितने दोघांनाही मारहाण केली, तेव्हा रोहितला संपविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. रात्री १ वाजता त्या दोघांचा रोहितसोबत पुन्हा वाद झाला. झेंडा चौकात दोघांनीही शस्त्रांनी वार करून रोहितचा खून केला. पोलिसांनी आरोपींना अटक केली. यातील एक अल्पवयीन दहावीचा विद्यार्थी आहे. त्यांना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
या घटनेत पोलिसांचा निष्काळजीपणासुद्धा उघडकीस आला आहे. रोहित अजनीतून तडीपार होऊन मागील सहा महिन्यांपासून गिट्टीखदान येथील पंचशीलनगरात राहत होता.
गिट्टीखदान पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पंचशीलनगर आहे. सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये डीबी चमू असते. बाहेरचा गुन्हेगार वस्तीत येऊन भाड्याने राहत असूनही पोलिसांना माहिती मिळत नाही, हे आश्चर्यजनक आहे.