तरुणाईला लागले ‘फिजेट स्पिनर’चे वेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2017 03:50 AM2017-06-27T03:50:29+5:302017-06-27T03:50:29+5:30
सध्या मार्केटमध्ये, बसस्टॉपवर, रेल्वे स्थानकांवर, कॉफी शॉप्समध्ये आणि महाविद्यालयाच्या कट्ट्यांवर, आवारात, कॅन्टीनमध्ये सर्वत्र एकच वस्तू सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे
अक्षय चोरगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्या मार्केटमध्ये, बसस्टॉपवर, रेल्वे स्थानकांवर, कॉफी शॉप्समध्ये आणि महाविद्यालयाच्या कट्ट्यांवर, आवारात, कॅन्टीनमध्ये सर्वत्र एकच वस्तू सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे; ती वस्तू म्हणजे ‘फिजेट स्पिनर’. मध्यभागी असणाऱ्या बेअरिंगच्या आधारे फिरणारी तीन पाती म्हणजे फिजेट स्पिनर.
बेअरिंगवर बोट ठेवायचे आणि स्पिनर फिरवत राहायचे. हे खेळणे फिरवत राहिल्याने मनावरील ताणतणाव कमी होत असल्याचा दावा विक्रेते करत आहेत. यातील तथ्य अजून समोर आलेले नसले तरी या खेळाने तरुणाईला सध्या कमालीचे गुंतवून ठेवल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे.
प्रत्येक काळात आणि प्रत्येक पिढीत वेगवेगळे ट्रेण्ड्स आणि फॅशन असतात. तरुणाई अशा नवनव्या फॅशनसोबत वाहवत जाते आणि त्याचे अनुकरणही करते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तरुणांचा कल फिजेट स्पिनरकडे वळलेला दिसतोय. हे खेळणे विविध रंगांत, विविध डिझाइन्स आणि धातूमध्येही उपलब्ध आहे.
प्लास्टिक, अॅल्यूमिनियम, फायबर, तांबे आणि अगदी सोन्या-चांदीसारख्या उंची धातूमध्येही फिजेट स्पिनर उपलब्ध आहे.
शॉपिंग साइट्ससह स्टेशनरी दुकाने, रस्ते आणि फुटपाथवरील फेरीवाल्यांकडे आणि मोठ्या ज्वेलर्सच्या दुकानात ते दिसून येत आहे.
अमेरिकेतील शाळांमध्ये बंदी-
या खेळण्याबाबत इंटरनेटवरून माहिती मिळाली आहे की, या खेळण्याची शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे विद्यार्थी अभ्यास सोडून या खेळण्यामध्ये गुंतत आहेत. यावर उपाय म्हणून अमेरिकेतील काही शाळांमध्ये या खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
खेळण्याच्या किमती -
फिजेट स्पिनरच्या किमती ५० रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत आहेत. फेरीवाल्यांकडे ५० ते एक हजार रुपयांपर्यंत आणि आॅनलाईन शॉपिंग संकेतस्थळांवर तीन हजार रुपयांपर्यंत किमतीचे फिजेट स्पिनर उपलब्ध आहेत.
अॅण्ड्रॉइडवरही लोकप्रिय-
एका कंपनीने फिजेट स्पिनर नावाचे अॅप लाँच केले. हे अॅप लाँच करताच अवघ्या काही दिवसांतच या अॅपची लोकप्रियता गगनाला भिडली. हे अॅप आतापर्यंत एक कोटी लोकांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड केले आहे. याच नावाचे अजून एक अॅप वेगळ्या कंपनीने लाँच केले. त्या अॅपलासुद्धा पन्नास लाख लोकांनी डाऊनलोड केले आहे. फिजेट स्पिनर गेमसुद्धा लाँच करण्यात आला आहे.
चिनी कनेक्शन-
नवनवीन चिनी बनावटीची खेळणी लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांसाठी आकर्षणाचा विषय बनत आहेत. त्यामुळे चायनिज खेळणी खेळत वाढलेल्या आताच्या पिढीला चायनिज फिजेट स्पिनरने वेड लावले आहे. हे खेळणे २५ ते ३० वर्षांपूर्वी चीनमध्ये अस्तित्वात आले. आपल्या देशात आणि मुख्यत: इथल्या मोठ्या शहरात या खेळण्याने २०१७ च्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये प्रवेश केला.
‘मोबाइल’ला मिळतो ब्रेक !
फिजेट स्पिनरच्या अतिवापरामुळे सध्याच्या पिढीला लागलेल्या मोबाइलच्या व्यसनाला ब्रेक मिळाला असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक तरुण जो वेळ मोबाइल वापरण्यात वाया घालवत होते, त्यापैकी काही वेळ फिजेट स्पिनरसोबत खेळण्यात घालवत आहेत. काही ठिकाणी कट्ट्यांवर फिजेट स्पिनरच्या स्पर्धा रंगताना पाहायला मिळत आहेत.