"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 05:01 PM2024-09-19T17:01:35+5:302024-09-19T17:08:15+5:30

Indurikar Maharaj : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे एक कीर्तन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या कीर्तनातून इंदुरीकर महाराजांनी तरुणाईला धर्मावरून होणाऱ्या हिंसेपासून दूर राहण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. 

Youngsters do not participate in riots, earnest appeal of Indurikar Maharaj | "धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

Indurikar Maharaj kirtan : "धर्माचा अभिमान नाही का? असे कुणी तुम्हाला विचारेल. त्याला सांगा तुमचा धर्म माईकवर आहे, आमचा आमच्या हृदयात आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमच्या धर्माचे भांडवल करु नका. धर्माच्या नावाखाली आमच्या गरीबांच्या पोरांचा बळी देऊ नका", असे म्हणत प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी तरुणांना धर्माच्या नावावर होणाऱ्या हिंसेपासून दूर राहण्याचे आवाहन केले. 

अकोला येथे इंदुरीकर महाराजांचे कीर्तन झाले. या कीर्तनात त्यांनी धर्मा आणि हिंसा या संवेदनशील विषयावर विवेचन केले. 

"मोठ्यांची पोरं कधी आत गेली नाही, जाणार नाहीत"

इंदुरीकर महाराज म्हणाले, "तरुणांनो, एक गोष्ट सांगतो. तुम्ही या दंगली-बिंगलीमध्ये पडू नका. माझ्या इतकी कीर्तने महाराष्ट्रामध्ये कुणी केली नाहीत. मी अनुभवांवरून सांगतोय. मी महिन्याला ८० कीर्तने करतो. माझी वाक्ये पुस्तकांमधील नाहीत. अनुभवांमधून आलेली आहेत."

"आता लोकांकडे असलेल्या पेनांमध्ये कॅमेरे आहेत. जर दंगली बिंगलीत दिसले, तर दहा वर्षे शिक्षा आहे. आतापर्यंत गरिबांचीच लेकरं आत गेली आहेत. मोठ्यांचे कधीही आत गेले नाहीत आणि जाणार नाहीत. हे मी तुम्हाला तळमळीने सांगतो", असे आवाहन इंदुरीकर महाराज यांनी केले. 

"...तर गेम झालाच म्हणून समजा"

"आज एकही काम पोलीस व्हेरिफिकेशनशिवाय होत नाही. हे लक्षात ठेवा. त्यामुळे दंगलीत पडू नका. जर पोलिसांचा दाखला चुकीचा मिळाला तर गेम झालाच म्हणून समजा. चारित्र्याचा दाखला देण्याचे काम पोलीस करत असतात. आम्ही काहीही केले नाही. बँक लुटली नाही, काही गुन्हा केला नाही. तरीही रोज नवे लफडे आहे माझ्याभोवती. एकच गुन्हा तो म्हणजे मी खरे बोलतो", असे इंदुरीकर महाराज म्हणाले.

"तुम्ही दंगली-बिंगलीत पडू नका. तुम्ही गरीब आहात. कुल्फी विका, अजून काही विका, पण असल्या गोष्टींमध्ये पडू नका. ४० टक्के पोरं पुढाऱ्यांच्या मागे फिरून भिकारी झाली आहेत. ज्यांनी आयुष्यभर पोरांचा वापर भोंगे बांधायला केला, ते नोकरी देऊ म्हणतात. मी मेल्यावर तुम्हाला मी काय म्हणतो आहे, याची आठवण येईल. पण, फरक काही पडणार नाही", असे इंदुरीकर महाराज म्हणाले. 

Web Title: Youngsters do not participate in riots, earnest appeal of Indurikar Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.