तरुणांनो, एका हाताने संगणक तर दुसऱ्या हाताने बंदूक चालवा!
By Admin | Published: April 27, 2015 03:44 AM2015-04-27T03:44:12+5:302015-04-27T03:44:12+5:30
चीनचा जगावर वाढत असलेला प्रभाव तसेच पाकिस्तानला केली जात असलेली भरीव आर्थिक मदत यामुळे आपण धास्तावलो असल्याचे सांगत ज्येष्ठ
पुणे : चीनचा जगावर वाढत असलेला प्रभाव तसेच पाकिस्तानला केली जात असलेली भरीव आर्थिक मदत यामुळे आपण धास्तावलो असल्याचे सांगत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी लष्करी प्रशिक्षण देणारी महाविद्यालये निर्माण व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. तरूणांनी एका हाताने संगणक चालविण्याचे ज्ञान मिळविण्याबरोबर दुसऱ्या हाताने बंदुक चालवायला शिकले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी भारती विद्यापीठाच्या विसाव्या स्थापना दिन समारंभात तरूण पिढीला दिला.
गोखले यांच्यासह ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, युवक क्रांती दलाचे प्रमुख डॉ. कुमार सप्तर्षी व विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. उत्तम भोईटे यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. सध्या बुद्धांक महत्त्वाचा वाटत असला तरी भावनांक सुद्धा महत्त्वाचा आहे, असे सांगून गोखले म्हणाले, मी वेगळ््याच विचाराने धास्तावलो आहे. तरुणांना फक्त संगणकाचे ज्ञान नको. त्यांनी एका हाताने बंदुक चालवावी. आपण महात्माजींच्या देशात राहत असलो तरी आक्रमणाशिवाय काही करू शकणार नाही.
शिक्षण संस्थांमधून इंजिनिअर, डॉक्टर व्हावेत पण उत्तम माणूस म्हणूनही तरूणांनी बाहेर पडायला हवे. सध्या शिक्षणाला वेगळे परिमाण प्राप्त झाले आहे. ते समजून घ्यायला हवे. जात, धर्म न पाहता समोरच्या व्यक्तीचा आदर करायला शिकले पाहिजे, असे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी नमुद केले. भारतीय नागरीकरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून द्यायला हवे. त्यासाठी शिक्षणातच त्याचा समावेश करायला हवा. कारण भारताला महासत्ता होण्यासाठी तरूणांचे योगदान महत्वाचे ठरणार आहे, असे मत डॉ. भटकर यांनी व्यक्त केले.
माणसामाणसांतील अंतर कमी करणे, जात-पात न मानणे हे शिक्षणाचे ब्रीद असले पाहिजे. समताधिष्ठित समाजरचना निर्माण झाली पाहिजे, असे डॉ. सप्तर्षी म्हणाले. अनेक शिक्षणसंस्थांवर एखाद्या जाती-धर्माचे नियंत्रण असल्याचे दिसते.
ठराविक धर्माचा पगडा दिसतो. भारती विद्यापीठाने मात्र राष्ट्रीय एकात्मता जोपासत शिक्षणातून समाजपरिवर्तन घडविले आहे, असे भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)