आपली स्पर्धा चीनच्या रेल्वेशी
By admin | Published: April 22, 2016 03:45 AM2016-04-22T03:45:42+5:302016-04-22T03:45:42+5:30
भारतीय रेल्वेला मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आवश्यकता आहे. चीनसारखा देश रेल्वेतील गुंतवणुकीत आघाडीवर असून, त्यांच्याकडून कोटींची गुंतवणूक होते
मुंबई : भारतीय रेल्वेला मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आवश्यकता आहे. चीनसारखा देश रेल्वेतील गुंतवणुकीत आघाडीवर असून, त्यांच्याकडून कोटींची गुंतवणूक होते. सध्या भारतीय रेल्वेची चीनच्या रेल्वेशी स्पर्धा असून, चीनसारखीच रेल्वे हवी असेल तर गुंतवणूक वाढली पाहिजे, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. मध्य रेल्वेच्या माटुंगा कार्यशाळेच्या शताब्दी वर्षाच्या सोहळ्याला प्रभू उपस्थित होते. त्या वेळी ते बोलत होते.
शताब्दी सोहळ्याला महापौर स्नेहल आंबेकर, मध्य रेल्वे महाव्यवस्थाक सुनील कुमार सूद, विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा व अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
सुरेश प्रभू आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, राजकारणापलीकडे जाऊन रेल्वेचा विकास झाला पाहिजे आणि त्यादृष्टीने पाऊल उचलणे गरजेचे आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाद्वारे आधुनिकीकरण करण्यावर भर दिला आहे. रेल्वेचे आधुनिकीकरण करण्यासाठी मोठी गुंतवणूक आवश्यक असून, ती वाढविण्यावर आम्ही भर देत आहोत. या वर्षी तब्बल ९४ हजार कोटींची गुंतवणूक रेल्वेत करण्यात आल्याची माहिती प्रभू यांनी दिली.
भारतात बुलेट ट्रेनसारखा मोठा प्रकल्प पूर्ण केला जाणार असून, त्यामध्ये १ लाख कोटी, महाराष्ट्रातील डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरसाठी ८५ हजार कोटी तर रेल्वेचे लोकोमोटिव बनविण्यासाठी दोन कारखाने उभारण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
> रेल्वेमंत्र्यांनी जाणून घेतल्या प्रवाशांच्या व्यथा
एरव्ही कमी गर्दी असणाऱ्या करी रोड स्थानकावर बुधवारी दुपारी १च्या सुमारास नेहमीपेक्षा जास्त गर्दी दिसून आली. निमित्त होते ते रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या लोकल प्रवासाचे. सुरेश प्रभू यांनी करी रोड स्थानकातून दुपारी १.0५च्या सुमारास सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलच्या प्रथम वर्गाच्या डब्यातून प्रवास केला. या प्रवासात प्रभू यांनी प्रवाशांशी मुक्तपणे संवाद साधला आणि या वेळी प्रवाशांनीही आपल्या व्यथा मांडल्या. यादरम्यान एका प्रवाशाने प्रभू यांना आपल्या घरातील लग्नाचे आमंत्रणही दिले.
मध्य रेल्वेच्या माटुंगा कार्यशाळेच्या शताब्दी वर्षाच्या सोहळ्याला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू उपस्थित होते.
करी रोड स्थानकातील नव्या पादचारी पुलाचा कोनशिला समारंभ त्यांच्या हस्ते पार पडला. या समारंभानंतर त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत नियोजित भेट होती. मात्र दुपारचा १ वाजला असल्याने आणि मुख्यमंत्र्यांशी नियोजित भेट ठरल्याने प्रभू यांनी लोकलनेच सीएसटी स्थानक गाठण्याचा निर्णय घेतला आणि कल्याणहून आलेली सीएसटी लोकल येताच ते लोकलच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात चढले. या प्रवासात रेल्वे अधिकारी, पोलीस, महापौर स्नेहल आंबेकर व अन्य लोकप्रतिनिधीही त्यांच्यासोबत होते. प्रवाशांनी गच्च भरलेल्या डब्यात रेल्वेमंत्री चढताच प्रवासीही अवाक् झाले. प्रत्यक्षात रेल्वेमंत्रीच आपल्यासोबत प्रवास करीत असल्याने आयती संधी साधत प्रवाशांनी त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. लोकलमधील अंतर्गत रचना, बसण्यासाठी असलेली आसनव्यवस्था, स्थानकांत असलेली प्रसाधनगृहे लोकलच्या वेळा व एसी लोकल याबाबत अनेक प्रश्न आणि समस्या प्रवाशांनी प्रभू यांच्यासमोर मांडल्या.
प्रभू यांनी प्रवाशांच्या समस्या ऐकतानाच त्यांच्या विविध प्रश्नांना नम्रपणे उत्तरेही दिली. (प्रतिनिधी)
>