"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 03:22 PM2024-11-08T15:22:35+5:302024-11-08T15:23:35+5:30
Raj Thackeray Maharashtra Election 2024: राज ठाकरेंची कोकणातील गुहागर येथे सभा झाली. या सभेत त्यांनी स्थानिकांच्या जमिनीचा मुद्दा मांडला.
Raj Thackeray Speech: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंच्या ठिकठिकाणी सभा होत असून, शुक्रवारी सकाळी गुहागर येथे सभा पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरेंनी बाहेरच्या लोकांकडून जमिनी खरेदी केल्या जात असल्याचा आणि कोकणच्या पर्यटनाच्या मुद्द्यावर जोर दिला.
राज ठाकरे म्हणाले, "एकदा माझ्या हाती सत्ता देऊन बघा मग बघा कसा कोकण गोवा, केरळपेक्षा मोठा श्रीमंत होईल. फक्त तुम्हाला माणसं बदलावी लागतील; आम्ही सत्तेत नसताना इतकी कामं केली. जर आम्ही सत्तेत आलो तर आम्ही काय करू? मी सत्तेसाठी मागत नाहीये, खुर्चीसाठी नाही मागत आहे. माझी इच्छा आहे की मला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे आणि त्यासाठी लागणारी इच्छाशक्ती माझ्याकडे आहे", अशी साद त्यांनी कोकणातील मतदारांना घातली.
तुमचा शत्रू जमिनी मार्गाने येतोय, कोकणवासियांना राज ठाकरेंचा इशारा
"मुंबईतल्या वरळीत १६७५ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला, तो किल्ला महाराजांनी समुद्रातून येणाऱ्या शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता. पण तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय, तो तुमची जमीन हडपतोय", असा इशारा राज ठाकरेंनी कोकणवासियांना दिला.
"नाणार प्रकल्पाच्या निमित्ताने जमिनी हडप केल्या मग नाणारला विरोध झाला मग बारसूला ठरलं प्रकल्प करायचा मग तिथे जमीन अधिग्रहण झालं. या जमिनी आल्या कुठून ? तुमच्याच जमिनी आहेत या.. मामुली किंमतीत तुमच्याकडून जमीन घ्यायची आणि वाट्टेल तशा किंमतीत सरकारकडून पैसे घेतले जातात. हे सगळं तुमच्या डोळ्यादेखत घडतंय आणि तरीही तुम्हाला याचं वाईट वाटत नाही. तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुमचं अस्तित्व संपलं. जगात युद्ध झाली ती जमिनीच्या मालकीसाठी हे विसरू नका", असे राज ठाकरे म्हणाले.
"तुम्ही ज्यांना निवडून दिलंत त्याच पक्षाचे लोकं तुमच्या जमिनीचे सौदे करत आहेत. बाकीचे सगळे जमिनी हडपण्यासाठी उभे आहेत तर हा राज ठाकरे सांगतोय की मी तुमच्या जमिनीवर विकास घडवून दाखवतो", अशी ग्वाही राज ठाकरेंनी यावेळी दिली.