मे महिन्यात 'या' दिवशी होणार तुमची सावली शून्य; झिरो शॅडो डे अनुभवा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 09:34 AM2022-04-27T09:34:23+5:302022-04-27T09:34:44+5:30
दुपारी १२ ते १२.३५ला सूर्य डोक्यावर येणार
अमरावती : येत्या मे महिन्यात वेगवेगळ्या तारखांना आणि वेगवेगळ्या शहरांत दुपारी १२ वाजता ते १२.३५च्या दरम्यान सूर्य अगदी डोक्यावर येणार आहे. त्यामुळे यादरम्यान कोणत्याही वस्तूची सावली ९० अंशाच्या कोनात राहील. म्हणजेच, यावेळी सरळ उभ्या वस्तूची सावलीच दिसणार नाही. हा ‘झिरो शॅडो डे’ असेल, अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने यांनी ‘लोकमत’ला दिली.
पृथ्वीचा अक्ष हा २३.३० अंशांनी कलला असल्यामुळे आपण सूर्याचे दक्षिणायन, उत्तरायण व दिवसाचे लहान-मोठे होणे अनुभवत असतो. याचाच परिणाम म्हणून विशिष्ट दिवशी शून्य सावलीचा अनुभव येतो. २२ मार्च रोजी पृथ्वीचे दोन्ही ध्रुव हे सूर्याकडे असतात. त्यामुळे या दिवशी समान कालावधीचा दिवस व रात्र असते. या दिवशी विषुववृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. २१ जूननंतर पृथ्वी, प्रदक्षिणा मार्गावर पुढे जात राहते, तेव्हा २३ सप्टेंबर या दिवशी पुन्हा पृथ्वीचे दोन्ही ध्रुव सूर्यासमोर येतात. विषुववृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. या दिवशी पुन्हा दिनमानसारखा अनुभव येतो.
भारतात ६ एप्रिलला अंदमान-निकोबार बेटापासून शून्य सावलीला सुरुवात झाली असून, आता महाराष्ट्रात मे महिन्यात शून्य सावली अनुभवता येईल, असे खगोल अभ्यासकांनी सांगितले.
असा घ्या अनुभव
मोकळ्या जागेत दुपारी १२ ते १२.३० वाजेदरम्यान समांतर पृष्ठभागावर एखादा दंडगोल, बाटली अथवा तत्सम वस्तू किंवा एखादा डबा अगदी सरळ उभा ठेवून शून्य सावलीचा थरार अनुभवता येईल.
शोधा तुमचे शहर आणि तारीख
३ मे सावंतवाडी व बेळगाव
४ मे मालवण
५ मे देवगड, राधानगरी, मुधोळ
६ मे कोल्हापूर, इचलकरंजी
७ मे रत्नागिरी, सांगली, मिरज
८ मे जयगड, कराड
९ मे चिपळूण, अक्कलकोट
१० मे सातारा व पंढरपूर
११ मे महाबळेश्वर, फलटण, तुळजापूर
१३ मे माणगाव, बारामती, बार्शी, उस्मानाबाद, औसा, मुळशी, पुणे, दौंड, लातूर
१४ मे अलिबाग, लोणावळा, तळेगाव दाभाडे, पिंपरी चिंचवड, जामखेड, अंबाजोगाई
१५ मे मुंबई, नवी मुंबई, कर्जत, बीड, माथेरान, राजगुरूनगर, गंगाखेड
१६ मे बोरीवली, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, खोडद, अहमदनगर, परभणी
१७ मे नालासोपारा, विरार, आसनगाव, वसमत
१८ मे पालघर, कसारा, संगमनेर, श्रीरामपूर, अंबड, हिंगोली
१९ मे डहाणू, नाशिक, कोपरगाव, वैजापूर, औरंगाबाद, जालना, पुसद
२० मे तलासरी, मेहेकर, वाशिम, वणी, चंद्रपूर, मूल
२१ मे मनमाड, कन्नड, चिखली
२२ मे मालेगाव, चाळीसगाव, बुलडाणा, यवतमाळ, आरमोरी
२३ मे खामगाव, अकोला, वर्धा
२४ मे धुळे, जामनेर, शेगाव, निंभोरा, उमरेड
२५ मे साक्री, अमळनेर, जळगाव, भुसावळ, अमरावती
२६ मे चोपडा, परतवाडा, नागपूर
२७ मे नंदूरबार, शिरपूर, गोंदिया
२८ मे शहादा, पांढुर्णा