एटीएमचा पासवर्ड विचारून युवकाची फसवणूक
By Admin | Published: November 3, 2016 09:02 PM2016-11-03T21:02:36+5:302016-11-03T21:02:36+5:30
कोरेगाव तालुक्यातील नांदगिरी येथील अक्षय संजय वाघ या युवकाच्या बँक खात्याची व एटीएम कार्डची माहिती घेऊन त्याच्या बँक खात्यातून ४ हजार रुपये परस्पर काढून घेण्यात
>आॅनलाईन लोकमत
सातारा, दि.03 - कोरेगाव तालुक्यातील नांदगिरी येथील अक्षय संजय वाघ या युवकाच्या बँक खात्याची व एटीएम कार्डची माहिती घेऊन त्याच्या बँक खात्यातून ४ हजार रुपये परस्पर काढून घेण्यात आले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षय वाघ याला दि. १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन केला. तुम्ही एका कंपनीन ८,८०० रुपये भरले आहेत, ते तुम्हाला थेट संबंधित कंपनीकडून १५ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. तुमचा बँक खात्याचा क्रमांक नोंदणीकृत झालेला नाही, त्यासाठी तुमचा एटीएमचा पासर्वड सांगा, अशी विनंती त्या व्यक्तीने केली. त्यावर वाघ याने एटीएमचा क्रमांक त्या व्यक्तीला सांगितला. त्यानंतर त्या व्यक्तीने तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल, त्यातील क्रमांक मला सांगा, असे बजावले. त्याप्रमाणे वाघ यांच्या मोबाईलवर मेसेज आल्यानंतर त्यांनी तो क्रमांक त्या व्यक्तीला सांगितला. त्यापाठोपाठ वाघ यांच्या खात्यावरून ४ हजार रुपये काढले असल्याचा मेसेज आला.
या प्रकाराबाबत वाघ यांनी बँकेच्या कोरेगाव शाखेत जाऊन चौकशी केली असता, अज्ञात व्यक्तीने मोबाईलद्वारे कॉल करून फसवणूक केली असल्याचे निदर्शनास आले.