जात पंचायतीच्या ‘वसुली’ला कंटाळून तरुणाची आत्महत्या; उस्मानाबादमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 08:43 AM2021-10-06T08:43:13+5:302021-10-06T08:43:55+5:30
पंचांच्या अटकेसाठी नातेवाईकांचा मृतदेहासह ठिय्या
उस्मानाबाद : मेहुणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून जात पंचायतीने २ लाख रुपयांचा दंड करून त्याच्या वसुलीसाठी तगादा लावल्याने उस्मानाबादेतील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोमनाथ छगन काळे असे या तरुणाचे नाव आहे. जात पंचायतीच्या पंचांना
अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी ठिय्या दिला होता. उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथील व सध्या उस्मानाबाद शहरात वास्तव्यास असलेल्या सोमनाथ काळे याचे त्याच्या मेहुणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पारधी समाजातील काही पुढाऱ्यांनी जात पंचायत भरविली होती. त्यात सोमनाथला २ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यापैकी २० हजार रुपये दंड वसूलदेखील केला. मात्र, उर्वरित १ लाख ८० हजार रुपये वसूल करण्यासाठी जात पंचायतीच्या पुढाऱ्यांनी सोमनाथकडे तगादा लावला होता. हे पैसे देण्यास विलंब केल्यास घृणास्पद शिक्षेला सामोरे जावे लागेल, अशी धमकी त्यास सातत्याने देण्यात येत होती. याच त्रासाला वैतागून सोमनाथ व त्याच्या पत्नीने २२ सप्टेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. सोमनाथची प्रकृती गंभीर झाल्याने त्यास सोलापूरला हलविण्यात आले. मात्र, मंगळवारी सोमनाथचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले.
याप्रकरणी जात पंचायतीच्या पंचांवर कारवाई करून त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नातेवाईकांनी मृतदेहासह आक्रोश केला. अखेर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. तहसीलदार गणेश माळी यांनी, संबंधितांवर गुन्हे दाखल करून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधीसाठी नेला.
घडलेली ही घटना निंदनीय आहे. यामागे जात पंचायतीचा दबाव असल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्र शासनाने यासाठी २०१७ मध्ये सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा बनविला आहे. त्या कायद्यांतर्गत जात पंचायतीच्या पंचांवर गुन्हे दाखल व्हावेत व तत्काळ अटक व्हावी, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. पीडित परिवाराचे पुनर्वसन होण्याची गरज आहे - कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, जात पंचायत मूठमाती अभियान