मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

By admin | Published: September 22, 2016 08:50 PM2016-09-22T20:50:31+5:302016-09-22T20:50:31+5:30

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी उटगी (ता. जत) येथील बाळासाहेब लक्ष्मण चव्हाण (वय ४०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Youth commits suicide for Maratha reservation | मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

Next

ऑनलाइन लोकमत
जत, दि. २२ : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी उटगी (ता. जत) येथील बाळासाहेब लक्ष्मण चव्हाण (वय ४०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. जत-वळसंग रस्त्यावरील केंचराया मंदिराच्या पत्र्याच्या शेडमध्ये गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता त्यांचा मृतदेह गळफासाने लटकताना आढळून आला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून, यामध्ये त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे लिहिले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

उटगी येथे बाळासाहेब चव्हाण व त्यांचा लहान भाऊ दिलीप (३५) यांची वडिलोपार्जित १५ एकर जिरायत शेतजमीन आहे. बाळासाहेब यांचे आठवीपर्यंत शिक्षण झाले होते. पत्नी वैशाली, आई सुसाबाई, दोन मुले राघवेंद्र (८ वर्षे) व लक्ष्मण (१२) यांच्यासोबत ते भावापासून विभक्त राहत होते. त्यांच्या वडिलांचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. उटगीपासून दीड किलोमीटरवर त्यांची शेतजमीन आहे. तीन दिवसांपूर्वी, नातेवाईकांना भेटायला जातो, असे सांगून ते घरातून बाहेर पडले होते. मंगळवेढा (जि. सोलापूर) येथे त्यांची बहीण आहे. बहिणीजवळ त्यांनी एक दिवस मुक्काम केला होता. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील आणखी काही नातेवाईकांना भेटण्यासाठी ते गेले होते. बुधवारी सायंकाळी, उटगीला जात असल्याचे सांगून ते नातेवाईकांच्या घरातून बाहेर पडले होते. रात्री ते जतला आले. त्यानंतर जत-वळसंग रस्त्यावरील केंचराया मंदिराच्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

गुरुवारी सकाळी जतमधील काही लोक मंदिरात दर्शनासाठी गेले असता, त्यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये चव्हाण गळफासाने लटकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लोकांनी जत पोलिस ठाण्यात दूरध्वनीवरून याची माहिती दिली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून चव्हाण यांचा मृतदेह खाली उतरविण्यात आला. त्यांच्या खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. चव्हाण यांच्या पिशवीतील साहित्यामध्ये त्यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली.

या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आक्रोश करीत आले. जत आणि वळसंगमधील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. चव्हाण कुटुंबप्रमुख होते, पण त्यांनीच आत्महत्या केल्याने या कुटुंबाला जबरदस्त धक्का बसला आहे. ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन तपासणी करुन दुपारी चव्हाण यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी मच्छिंद्र बाबर यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

आरक्षण द्यावे
चव्हाण यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात चिठ्ठी लिहिली आहे. ह्यमराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, पत्नी व मुलांचा व्यवस्थित सांभाळ करावाह्ण, असा मजकूर चिठ्ठीत आहे. चव्हाण यांचा मुलगा राघवेंद्र पाचवीत, तर लक्ष्मण आठवीत शिकत आहे. आरक्षणासाठी चव्हाण यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त पसरताच जिल्ह्यात खळबळ माजली आहे. रात्री उशिरा उटगी येथे त्यांच्यावर अंत्यसस्कार करण्यात आले.

पहिलीच घटना
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी समाजाचा गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. गेल्या पंधरवड्यापासून तर संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अभूतपूर्व मोर्चे काढले जात आहेत. सोलापुरात बुधवारीच मोर्चा काढला होता. चव्हाण बुधवारी सोलापुरातच होते, अशी माहिती पोलिस चौकशीतून पुढे आली आहे. सांगलीत २७ सप्टेंबरला मोर्चा निघणार आहे. आरक्षणासाठी चव्हाण यांनी केलेली आत्महत्या, ही राज्यातील पहिलीच घटना आहे.

Web Title: Youth commits suicide for Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.