मेट्रो स्थानकात ट्रेनखाली तरुणाची आत्महत्या
By Admin | Published: September 19, 2016 03:42 AM2016-09-19T03:42:30+5:302016-09-19T03:42:30+5:30
मेट्रोच्या साकीनाका स्थानकात उदय कुमार गणेश प्रसाद या २५ वर्षीय तरुणाने ट्रेनखाली आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली.
मुंबई : मुंबई मेट्रोच्या साकीनाका स्थानकात उदय कुमार गणेश प्रसाद या २५ वर्षीय तरुणाने ट्रेनखाली आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. तो मूळचा बिहारचा राहणारा असल्याचे साकीनाका पोलिसांकडून सांगण्यात आले.
सकाळी ९.२0च्या सुमारास उदय कुमार मेट्रोच्या साकीनाका स्थानकात आला. वर्सोवा-घाटकोपर ट्रेन स्थानकात येताच ट्रेनसमोर त्याने उडी घेतली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पाहताच मेट्रो कर्मचाऱ्यांनी तत्काळ याची माहिती साकीनाका पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी येईपर्यंत मेट्रो सेवा काही काळ विस्कळीत झाली. तोपर्यंत मेट्रो फक्त मरोळ नाका ते वर्सोवापर्यंत चालविली जात होती. त्यामुळे मेट्रोला एकच गर्दी झाली. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर उदय कुमार याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठविण्यात आला.
यासंदर्भात साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. धर्माधिकारी यांना विचारले असता, उदय कुमार हा बिहारमध्ये राहणारा होता. त्याच्याजवळ असणाऱ्या आधार कार्डावरून त्याची ओळख पटली. आत्महत्येमागील कारण अद्याप समजले नसून अधिक तपास सुरू असल्याचे ते म्हणाले. मुंबईबरोबरच बिहारमधील त्याच्या मित्रपरिवाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे मेट्रो जवळपास दीड तास विस्कळीत झाली होती. (प्रतिनिधी)