कर्जाला कंटाळून तरूण शेतकऱ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 04:20 PM2019-02-18T16:20:36+5:302019-02-18T16:20:56+5:30
कर्जबाजारीपणाला कंटाळून वैफल्यग्रस्त तरूण शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना देसाईगंज तालुक्याच्या अरततोंडी येथे रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
मोहटोला/किन्हाळा (गडचिरोली) - कर्जबाजारीपणाला कंटाळून वैफल्यग्रस्त तरूण शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना देसाईगंज तालुक्याच्या अरततोंडी येथे रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
दुधचरण राऊत (२७) रा.अरततोंडी असे मृत शेतक-याचे नाव आहे. दुधचरण याचे लग्न गेल्यावर्षीच झाले होते. संयुक्त कुटुंबात दुधचरण हा धाकटा आहे. त्याच्या आईवडिलांचा चार वर्षापूर्वी मृत्यू झाला. मोठा भाऊ विवाहित असून हे दोघेही जण एकत्र राहात होते. राऊत कुटुंबाकडे वडिलोपार्जीत तीन एकर शेती आहे. सततची नापिकी, घरात अठराविश्व दारिद्र्य, लग्न व शेतीकामासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज त्याच्यावर होते. याशिवाय काही खासगी कर्जही त्याने घेतले होते. कर्ज परतफेडीची चिंता दुधचरणला सतावत होती. या चिंतेने तो दिवसेंदिवस वैफल्यग्रस्त असायचा. शेवटी रविवारी त्याने स्वयंपाकखोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी दुधचरणची पत्नी दुसºया खोलीत भोजन करीत होती.
देसाईगंज पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा अधिक तपास सहायक फौजदार मोहन सयाम करीत आहेत.