वाळू माफियांकडून तरुणांना मारहाण
By admin | Published: May 9, 2014 09:13 PM2014-05-09T21:13:36+5:302014-05-09T22:30:38+5:30
वाडा तालुक्यात अवैध रेती उपसा व वाहतूक राजरोसपणे सुरू आहे.
एक अटकेत : वाडयात अवैध रेती व्यावसायिकांचे पेव
वाडा- वाडा तालुक्यात अवैध रेती उपसा व वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. वाहतूक करणार्या टोळक्यांचा सुळसुळाट झाला असूनगुरूवारी (दि. ८) रात्री रस्त्यावरून प्रवास करणार्या तरुणांच्या अंगावर भरधाव वाहन घातल्याचा जाब विचारण्यासाठी गेल्यावर या तरुणांना बेदम मारहाण झाल्याचा प्रकार घडला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी एकास अटक केली असून त्याच्या साथीदार फरार आहे़
वाडा तालुक्यातील शिळफाटा या ठिकाणी विक्रांत पाटील हा तरुण आपल्या मित्रासह पिळ गावाच्या दिशेने जात असताना मलवाडा नदीवरून रेतीची अवैध वाहतूक करणारा भरधाव ट्रक तरुणांच्या अंगावर घातला गेला. यात थोडक्यात बचाल्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी तो गेला असता ट्रकच्या सोबत असणारा दर्शन भोईर, चालक इकबाल शेख व अन्य तीन साथिदारांनी विक्रांत पाटील व त्याचा मित्र महेंद्र पाटील यांना बेदम मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या बाबत सदर तरुणांनी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता वाडा पोलिसांनी दर्शन भोईर याला अटक केली असून अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. रेतीचा अवैध वाहतूक करणारा ट्रकही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
वाळू उपशावर कायद्याने बंदी असतानाही वाडा तालुक्यातील पिंजाळ, वैतरणा, तानसा या नद्यांवर राजरोसपणे रेतीचा उपसा सुरू असतो. रेतीची वाहतूक रात्री खुलेआमपणे केली जात असताना महसूल विभाग मात्र धिम्म आहे. महसूल विभागाशी अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याने ते कारवाई करीत नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान रेतीची वाहतूक करणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी वरील तरुणांनी केली आहे. (वार्ताहर)