चालत्या रेल्वेतून पडून तरुणाने गमावला पाय
By admin | Published: November 3, 2016 05:31 AM2016-11-03T05:31:41+5:302016-11-03T05:31:41+5:30
कल्याण-विठ्ठलवाडी दरम्यान खाली पडला. त्याला या अपघातात डावा पाय गमवावा लागला आहे.
कल्याण : भिवपुरी येथे राहणारा भुवनेश्वर अशोक दुबे हा दिवाळीनिमित्त मित्रांना भेटण्यासाठी कल्याणकडे आला होता. घरी परत जाण्यासाठी कल्याणहून कर्जत गाडी पकडली. गाडीला गर्दी असल्याने तो कल्याण-विठ्ठलवाडी दरम्यान खाली पडला. त्याला या अपघातात डावा पाय गमवावा लागला आहे. त्याच्यावर मुंबईतील शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना ३१ आॅक्टोबर रोजी घडली.
भुवनेश्वर हा १७ वर्षांचा असून त्याचे इयत्ता ९ वीपर्यंत शिक्षण झालेले आहे. तो दिवाळीनिमित्त मित्रांना भेटण्यास कल्याणला आला होता. त्याने पुन्हा भिवपुरीला जाण्यासाठी कर्जत गाडी पकडली. ४ वाजून ३० मिनिटांच्या कर्जत गाडीला गर्दी होती. गर्दी असल्याने तो कल्याण विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान गाडीतून खाली पडला. या अपघातातून तो बचावला खरा, पण त्याला कायमचे अपंगत्व आले आहे. त्याच्या गाडीचे चाक गेल्याने डावा पाय गुडघ्याच्या वरपासून गमाविण्याची वेळ त्याच्यावर आली. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी त्याला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी रुग्णवाहिका सेवा मोफत असतानादेखील तिच्या चालकाने त्याला तातडीने उपचारासाठी शीव रुग्णालयात हलविण्यासाठी पैशाची मागणी केल्याचा आरोप भुवनेश्वरचे वडील अशोक दुबे यांनी केला. (प्रतिनिधी)
>मुलाच्या भल्यासाठी बदलेले होते घर...
भुवनेश्वरचे वडील अशोक दुबे हे मुलुंड कॉलनीत राहत होते. मुलगा भुवनेश्वर अभ्यास नीट करीत नाही. मित्राच्या सोबत असतो. त्यामुळे त्यांनी घर बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भिवपुरीला घर घेतले. भुवनेश्वर आधी मुलुंडच्या दयानंद शाळेत होता. नववीची परीक्षा असताना त्याचे डोके दुखत होते. तो आजारी होता. आता अपघात झाल्याने त्याला कायमचे अपंगत्व आले आहे.