हुडहुड वादळात माजगावातील युवक शहीद

By admin | Published: October 14, 2014 09:51 PM2014-10-14T21:51:29+5:302014-10-14T23:24:06+5:30

नौदलात होता कार्यरत : शुभम सावंतचा मृतदेह गुरूवारी आणणार

Youth martyrs of Majjawah in Hudhud storm | हुडहुड वादळात माजगावातील युवक शहीद

हुडहुड वादळात माजगावातील युवक शहीद

Next

सावंतवाडी : आंध्रप्रदेश व ओडिशाच्या किनारपट्टीवर आलेल्या हुडहुड या चक्रीवादळामध्ये विशाखापट्टणम येथे नौदलात कार्यरत असलेला सावंतवाडी माजगाव येथील युवक शुभम उदय सावंत (वय २२) याची बोट समुद्रातील झंझावाती वारा व वादळात सापडल्याने वाहून गेली. या बोटीतील पाचजण शहीद झाले आहेत. त्यात शुभमचा समावेश आहे. याबाबतची माहिती मंगळवारी प्रशासनाला प्राप्त झाली असून सायंकाळी उशिरा नातेवाईकांना ही माहिती देण्यात आली आहे.
आंध्रप्रदेश व ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावर ताशी १७० ते १८० किलोमीटर वेगाने गेले दोन दिवस हुडहुड हे चक्रीवादळ आले आहे. या चक्रीवादळात अनेकजण वाहून गेले तसेच मोठ्या प्रमाणात किनारपट्टी भागाचे नुकसान झाले आहे. त्यातच माजगाव येथील शुभम सावंत हा गेल्या वर्षीच नौदलात दाखल झाला होता. त्याची नेमणूक विशाखापट्टणम येथे होती. ज्यावेळी हुडहुड हे वादळ विशाखापट्टणम समुद्रकिनारी आले तेव्हा शुभम सावंत यांची बोट समुद्रात होती. यावेळी त्यांच्यासोबत अन्य पाच जण होते.
हे पाचही जण या वादळामुळे समुद्रात वाहून गेले. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असून त्यांचे मृतदेह सोमवारी तेथील स्थानिक प्रशासनाच्या हाती लागले. त्यात सावंतवाडी माजगाव येथील शुभमचा मृतदेह होता. त्यांनी याबाबतची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनास दिली. प्रशासनाने याबाबत माजगावातील काही ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी उशिरा शुभमच्या घरीही ही घटना सांगण्यात आली.
शुभम हा एकुलता एक मुलगा असून तो माजगाव येथील हरसावंतवाड्यात राहतो. गेल्या वर्षीच तो नौदलात रूजू झाला होता. त्याचे शिक्षण माजगाव येथील शाळेत झाले. त्यानंतर पुढील शिक्षण पंचम खेमराज महाविद्यालयात झाले होते. शुभमच्या मृत्यूची बातमी माजगावसह सावंतवाडीत समजताच शोककळा पसरली आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शुभमचा मृतदेह गुरूवारी त्याच्या माजगाव येथील घरी आणण्यात येणार आहे. त्याच्या पश्चात आई, वडिल, बहीण, भावजी असा परिवार आहे. सुस्वभावी, हुशार म्हणून शुभमची माजगावात ओळख होती. (प्रतिनिधी)

Web Title: Youth martyrs of Majjawah in Hudhud storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.