कायद्याचा धाक नको तर आदर हवा; तरुणाई सांगते वाहतुकीच्या नियमांचं पालन करा
By सायली शिर्के | Published: September 17, 2019 02:31 PM2019-09-17T14:31:37+5:302019-09-17T14:37:23+5:30
दंड की लूट, फक्त पैसे मिळवण्यासाठी हे सुरू केलं अशी टीका सुरू झाली तर दुसरीकडे या निर्णयाचं स्वागतही झालं.
नियम हे मोडण्यासाठीच असतात असं ताठ मानेने बोलणाऱ्यांची गेल्या 15 दिवसांत हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी परिस्थिती झालीय... ही किमया घडवली ती नवीन मोटार वाहन कायद्याने. नियम धाब्यावर बसून भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर आता चाप बसणार आहे. एखाद्या गोष्टीची भीती दाखल्याशिवाय लोक बदलत नाहीत यावेळीही तसंच झालं. वाहतुकीचा दंड वाढवला आणि सगळे सरळ होण्याच्या मार्गावर आले. पण चांगल्या गोष्टी म्हटल्या की विरोध ही आलाच, तसा या गोष्टीला ही तो झालाच. कायद्याबाबत धाक नाही तर आदर असणं गरजेचं आहे तरच त्याचा उद्देश खऱ्या अर्थाने साध्य होईल.
दंड की लूट, फक्त पैसे मिळवण्यासाठी हे सुरू केलं अशी टीका सुरू झाली तर दुसरीकडे या निर्णयाचं स्वागतही झालं. नियम हवेत पण दंड नको असं अनेकांनी म्हटलं तर काही जण फक्त सर्वसामान्यांकडून पैसे उकळण्याचा नवा धंदा असं बोलून मोकळे झाले. दंडासोबत उत्तम रस्ते, पार्किंग यासारख्या सुविधाही दिल्या गेल्या पाहिजेत. पावसाळ्यात रस्त्याची झालेली चाळण याबद्दल काही वेगळं बोलायला नको कारण त्याची अवस्थाच सगळं सांगून जाते. मात्र खड्ड्यांमुळे अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण यांचं उत्तरही सरकारने दिलं पाहीजे. वाहतूक पोलिसांवर होणारे हल्ले या नव्या कायद्यामुळे थांबतील अशी आशा आहे. पण या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड हवी. अन्न, वस्त्र, निवारा, वायफाय आणि गाडी अशी गरज असणाऱ्या तरुणाईने नवीन मोटार वाहन कायद्याबाबत आपली मतं मांडली ती जाणून घेऊया.
नव्या कायद्यामुळे वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत
नव्या मोटार वाहन कायद्यामुळे वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होईल. मात्र याची प्रभावी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. वाहन चालवताना हेल्मेट वापरणं, गाडीचा वेग, सिग्नल तोडू नये हे नियम सर्वांना माहीत असतात पण अनेकदा वेळ आणि काम यामुळे काही जण ते नियम पाळत नाहीत. मात्र प्रत्येकाने या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. आता दंडाची रक्कम वाढलेली असल्याने खिशाला कात्री लागू नये म्हणून तरी नियम नक्कीच पाळले जातील.
- कुलदीप साळुंखे
दंडाची रक्कम वाढवण्यापेक्षा चांगले रस्ते करा
दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा ऐरणीवर येतो आणि त्यावरून राजकारण तापतं. मात्र यामध्ये खड्ड्याची अवस्था ही तशीच राहते. नियम हवेत मात्र दंडाची रक्कम खूप जास्त आहे. वाहतुकीचे नियम लोकांनी पाळावेत यासाठी केवळ दंड वाढवून फायदा नाही तर चांगले रस्ते करा जेणेकरून त्यामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या ही कमी होईल. खड्ड्यांमुळे जाणारे जीव वाचतील.
- समृद्धी महाडीक
वाहतुकीच्या नियमांचं पालन करा
वाहतुकीचे नियम हे आधीपासूनच होते. मात्र आता त्यातील दंडाची रक्कम वाढवल्याने प्रकर्षाने त्याची जाणीव झाली. खरं तर दंड वाढवल्याने या कायद्याची लोकांमध्ये भीती राहील. मात्र सर्वसामान्यांना परवडेल असा दंड असणं गरजेचं आहे. त्यासोबतच लोकांनी देखील वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे.
- नितेश राऊत
मोटार वाहन कायद्यातील दंड जास्त वाटतोय?; मग 'हे' आकडे पाहून हादरालच!https://t.co/p3PogCB5iD#TrafficFines#TrafficRules
— Lokmat (@MiLOKMAT) September 5, 2019
दंड वसुलीतही पारदर्शकता असायला हवी
वाहतुकीचे नियम मोडल्यावर पावती फाडण्याऐवजी चिरीमिरीच दिल्याचे प्रकार अनेकदा समोर येत असतात. 1 सप्टेंबरपासून दंडाच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. मात्र आता सर्वप्रथम दंड वसुलीत पारदर्शकता असायला हवी. रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी जेणेकरून नियम मोडणाऱ्यांच्या गाड्यांचे नंबर समजण्यास मदत होईल आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करता येईल.
- अभिजीत सकपाळ
खड्डे मुक्त रस्ते आणि पार्किंगसारख्या सुविधाही द्या
वाहतुकीचे नियम मोडताना आता सर्वजण दहा वेळा तरी विचार करतील. बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांवर चाप बसविण्यासाठी नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला. कायद्याचं स्वागत आहे पण यासोबतच खड्डे मुक्त रस्ते आणि पार्किंगसारख्या सुविधाही लोकांना देण्यात आल्या पाहीजे. तसेच दंड वसुलीतही पारदर्शकता असायला हवी.
- समिक्षा मोरे
भारतात वाहतुकीचे नियम मोडल्यास 15 हजारापर्यंत दंड तर 2 वर्षाची शिक्षा
सामान्य दंडाची रक्कम - पूर्वी 100 रुपयांवरून आता 500 रुपये
हेल्मेट न घालता गाडी चालविणे - पूर्वी 100 रुपये दंड होता तर आता 1 हजार रुपये दंड आणि 3 महिने परवाना निलंबित
विना परवाना गाडी चालविणे - पूर्वी 500 रुपये दंड होता तर आता 5 हजार रुपये
दुचाकीवर तीन जणांनी प्रवास केला तर पूर्वी 100 रुपये दंड होता तर आता 2 हजार रुपये दंड आणि 3 महिने वाहन परवाना निलंबित करण्याची शिक्षा
सीट बेल्ट न घालता गाडी चालविणे - पूर्वी 100 रुपये दंड होता तर आता 1 हजार रुपये
वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे - पूर्वी 1 हजार रुपये दंड होता तर आता 5 हजार रुपये
भरधाव वेगाने वाहन चालविल्यास - पूर्वी 400 रुपये दंड होता तर आता पहिल्यांदा पकडल्यास हलक्या वाहनांवर 1 ते 2 हजार रुपये दंड तर जड वाहनांना 2 ते 4 हजार रुपये दंड आकारण्यात येईल, आणि दुसऱ्यांदा पकडल्यास परवाना जप्त करण्यात येणार आहे.
रॅश ड्रायव्हिंग - पहिल्यांदा 6 महिने ते 1 वर्षांपर्यंत जेल आणि 1 हजार ते 5 हजार दंड तर दुसऱ्यांदा 2 वर्षापर्यंत जेल आणि 10 हजार रुपये दंड
दारू पिऊन गाडी चालविल्यास - पहिल्यांदा 6 महिने जेल आणि 10 हजार रुपये दंड तर दुसऱ्यांदा 2 वर्ष जेल आणि 15 हजार रुपये दंड