'ती' असते कुणाची आई, कुणाची ताई... हिंगणघाटच्या भयावह घटनेकडे कशी पाहते मुंबईची तरुणाई?

By सायली शिर्के | Published: February 12, 2020 04:45 PM2020-02-12T16:45:43+5:302020-02-12T16:58:40+5:30

दोन वर्षाच्या चिमुकलीपासून ते साठ वर्षांच्या आजींचीदेखील या विकृतीच्या जाळ्यातून सुटका नाही.

youth opinion about women safety in india | 'ती' असते कुणाची आई, कुणाची ताई... हिंगणघाटच्या भयावह घटनेकडे कशी पाहते मुंबईची तरुणाई?

'ती' असते कुणाची आई, कुणाची ताई... हिंगणघाटच्या भयावह घटनेकडे कशी पाहते मुंबईची तरुणाई?

Next

हिंगणघाट जळीत प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. संतप्त प्रतिक्रिया देत अनेकांनी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. या घटनेनंतर पुन्हा एकदा देशातील मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग, बलात्कार, रस्त्याने जाताना, ट्रेन, बसमध्ये प्रवास करताना मुद्दाम दिले जाणारे धक्के, मॉल आणि इतर ठिकाणी असलेले छुपे कॅमेरे, रिक्षा, टॅक्सीमधून प्रवास करताना चालकाची वाईट नजर आणि कृतीमुळे धावत्या वाहनातून घेतलेली उडी, जाता-येता महिलांच्या संदर्भात कानावर पडणारी अश्लील वाक्य अशा अनेक गोष्टी स्त्रियांच्या बाबतीत घडत असतात. मग कसं म्हणायचं की देशातील स्त्रिया सुरक्षित आहेत. 

महिला किती असुरक्षित आहेत हे रोज घडत असलेल्या उदाहरणांवरून सिद्ध होतं. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे व्हिडिओ हे अगदी क्षणार्धात व्हायरल होतात. एखाद्या ठिकाणी असं काही घडत असेल की आपसूकच फोटो आणि व्हिडिओ काढायला फोन घेऊन हात पुढे सरसावतात. मात्र अशा संतापजनक धक्कादायक घटना घडताना कोणीच मदतीसाठी पुढाकार घेत नाही. सगळं मुकाट्याने पाहत गप्प बसतात हीच पुढारलेल्या समाजाची शोकांतिका आहे. विनयभंग, बलात्कार हा रोजचाच झाला आहे. दोन वर्षाच्या चिमुकलीपासून ते साठ वर्षांच्या आजींचीदेखील या विकृतीच्या जाळ्यातून सुटका नाही. महिला सुरक्षित आहेत का?... या प्रश्नावर तरुणाईचं मत जाणून घेऊया.

 

महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला

हिंगणघाट येथील घटना अत्यंत वाईट होती. आरोपीला कायमस्वरूपी लक्षात राहील अशी कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी. विनयभंगाच्या अनेक घटना रोज घडत असतात. महिलांकडे पाहण्याची हिंमत होणार नाही अशा शिक्षा दिल्या जाव्यात. जेणेकरून आरोपींवर जरब बसेल. प्रत्येक मुलगी ही कोणाची तरी बहीण आणि मुलगी असते. महिला सुरक्षिततेसाठी उपाययोजना करताना स्त्रियांकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टीकोन बदलणं गरजेचं आहे. 

- शुभम शिंदे

मानसिक बलात्काराचं काय?

बलात्काराच्या अनेक घटना रोज घडतात. मात्र जेव्हा किळसवाण्या, हापापलेल्या नजरा स्त्रियांकडे विकृत भावनेने पाहतात तेव्हा होणारा मानसिक बलात्कार हा त्याहूनही भयंकर असतो. सर्वात जास्त वाईट या गोष्टीचं वाटतं की, या विकृतीच्या जाळ्यातून लहान मुलींचीही सुटका नाही. त्या निरागस जीवाला विनयभंग, बलात्कार या शब्दांचे अर्थ ही माहीत नाही. कधी फिरायला नेण्याच्या बहाण्याने तर कधी चॉकलेटच अमिष दाखवून बलात्कार केला जातो. अशा घटनांमुळे बालमनावर काय परिणाम होत असेल याचा विचार करून अंगावर काटा येतो. 

- प्राजक्ता पाटील


निर्भयानंतर ही परिस्थिती जशीच्या तशीच

निर्भया प्रकरणाची तीव्रताच इतकी होती की देशभरातून त्याचा निषेध करण्यात आला. निर्भयानंतर कायद्यात कठोर तरतूदी केल्या असल्या तरी बलात्काराच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. आरोपींना शिक्षेची भीतीच उरली नाही त्यामुळे अनेक घटना समोर येत आहेत. हिंगणघाट असो वा हैदराबाद निष्पाप बळी गेलेल्या सर्वांनाच लवकरात लवकर योग्य न्याय मिळावा ही अपेक्षा आहे. 

- अभिजीत पवार

सीसीटीव्ही कॅमेरे असणं गरजेचं 

विकृत विचार, वाईट नजर बदलणं अत्यंत गरजेचे आहे. माटुंगा स्टेशनवरील विनयभंगाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली म्हणून सर्वांसमोर आली. समजा कॅमेरे नसते आणि मुलीने घडलेला प्रकार सांगितला असता तर तिच्यावर कोणी लगेच विश्वासच ठेवला नसता. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असणं आवश्यक आहे. या सगळ्यांमध्ये सगळ्याच पुरुषांना दोष देणं चुकीचं आहे कारण सगळे सारखे असतात पण एकसारखे कधीच नसतात. 

- समिक्षा मोरे


अत्याचाराविरोधात आवाज उठवत आहेत

विनयभंग, बलात्कार, महिलांवरील हल्ले अशा कृत्यांची संख्या वाढत असली तरी स्त्रिया त्या विरोधात आवाज उठवून लढत आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आधी ही अशा गोष्टी समाजात घडत होत्या. मात्र पण आता स्त्रिया पुढाकार घेऊन तक्रार दाखल करताना मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. खरंतर आपण फक्त महिला सुरक्षितता म्हणतो, त्यावर उपाययोजना व्हाव्यात अशा चर्चा ही जोरदार करतो. त्यावर उपाय सुचविले जातात पण तरीही अजून किती महिला सुरक्षित आहेत यावर एक प्रश्नचिन्हच दिसते. 

- योगेंद्र कदम

शिक्षेला विलंब नको 

लहानपणापासूनच आई-वडिलांनी मुलांवर उत्तम संस्कार करणं आवश्यक आहे. दोघांमध्ये भेदभाव न करता त्यांना समसमान वागणूक द्या. तसेच मुलांना महिलांचा आदर करायला शिकवा. म्हणजेच मुलींबाबत वाईट विचार करण्याची त्यांची हिंमत होणार नाही. बलात्कार आणि इतर गुन्ह्यांसाठी कायद्यामध्ये अनेक शिक्षा देण्यात आल्या आहेत. मात्र त्याची लगेचच अमलबजावणी करण्यात यावी, त्याला उशीर लागू नये. म्हणजे वाईट कृत्य करणाऱ्यांच्या मनात त्याची एक भीती निर्माण होईल. 

- प्रतिक्षा खांडेकर

 

Web Title: youth opinion about women safety in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.