युवाशक्तीमुळे भारत जगावर राज्य करेल
By Admin | Published: January 28, 2017 12:04 AM2017-01-28T00:04:17+5:302017-01-28T00:04:17+5:30
जगामध्ये केवळ भारत हा देश तरुण असून येथील युवाशक्तीमुळे लवकरच जगावर राज्य करील, हे जगानेही मान्य केले आहे.
राजगुरुनगर : ‘जगामध्ये केवळ भारत हा देश तरुण असून येथील युवाशक्तीमुळे लवकरच जगावर राज्य करील, हे जगानेही मान्य केले आहे. त्यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये नोकरीतील आरक्षणापेक्षा युवकांनी स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध करून देण्याची मागणी करावी, असे प्रतिपादन अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बोकील यांनी राजगुरुनगर येथे व्यक्त केले.
हुतात्मा राजगुरु महाविद्यालयातील साहेबराव बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेमध्ये ‘देशाला गरज एका अर्थक्रांतीची’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टे-पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर, संचालक शां. ल. घुमटकर, डॉ. अनिल खिंवसरा, बाळासाहेब सांडभोर, सुशील शिंगवी, सुभाष टाकळकर, मुरलीधर खांडगे, अंकुश कोळेकर, अॅड. राजमाला बुट्टे-पाटील, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, उपप्राचार्य एच. पी. जाधव उपस्थित होते.
बोकील म्हणाले, आरक्षणाऐवजी व्यवसायासाठी भांडवलाची मागणी सरकारकडे केली पाहिजे. त्यामधून उद्योग उभे राहतील. नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था बदलायला सुरुवात झाली असून लोकांकडे पडून असलेला पैसा व्यवहारात आला आहे. व्यवहार पारदर्शी होऊ लागले आहेत. देशाच्या तिजोरीत कररूपाने भर पडली आहे. देशाबाहेरून पोसला जाणाऱ्या दहशतवादाला आळा बसला आहे.
बनावट नोटा, भ्रष्टाचारामुळे होणारी अर्थव्यवस्थेची हानी टळली आहे. नोटाबंदीचे परिणाम तातडीने दिसणार नसून हळूहळू त्याचा सर्वांनाच फायदा होईल.’ प्रा. व्ही. बी. दौंडकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेंद्र शिरसी यांनी प्रास्ताविक केले.
कोमल गायकवाड हिने आभार मानले. (वार्ताहर)