युवकांचे योगदान हवे - राज्यपाल
By admin | Published: June 22, 2016 04:00 AM2016-06-22T04:00:57+5:302016-06-22T04:00:57+5:30
योगाला लोकचळवळ बनवून तो दैनंदिन जीवनाचा भाग बनण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. यासाठी समाजात योगाचे महत्त्व विशद करून जनजागृती करावी
मुंबई : योगाला लोकचळवळ बनवून तो दैनंदिन जीवनाचा भाग बनण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. यासाठी समाजात योगाचे महत्त्व विशद करून जनजागृती करावी, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंगळवारी केले. योग दिनानिमित्त मुंबई विद्यापीठ व कैवल्यधाम या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कलिना येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते.
योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून मनशांती, सुदृढ आरोग्य व स्वस्थ जीवनासाठी उपयोगी आहे. नियमित योगामुळे सर्व शारीरिक व्याधींवर मात करणे शक्य आहे. स्वस्थ भारताच्या उभारणीसाठी योग ही लोकचळवळ होणे गरजेचे आहे. यासाठी युवकांनी योगदान द्यावे. राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी आयुष मंत्रालयामार्फत जारी करण्यात आलेले योगाविषयीचे सामान्य नियम व महत्त्व लोकांना समजून सांगण्यासाठी युवकांना प्रशिक्षण द्यावे. योगविषयक कार्य करणाऱ्या कैवल्यधामसारख्या संस्थांनी कुशल योगासन शिक्षकांच्या निर्मित्तीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही राज्यपालांनी केले.
मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या त्रिमूर्ती प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये मंत्रिमंडळ सदस्य
आणि अधिकारी वर्गाने सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
मंत्री, अधिकारी -कर्मचाऱ्यांचाही
उत्साहाने सहभाग
दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबई पोर्ट ट्रस्ट, योग कला-उपासना फाउंडेशन आणि पतंजली यांच्या वतीने गेट वे आॅफ इंडिया येथे योग आणि प्राणायाम करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महानिरीक्षक संजय कुमार, भाभा अणू संशोधन केंद्राचे सीनियर कंमाडर सबीर सिंग, पतंजलीचे सुरेश यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्रालयात योगासने
मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अपर मुख्य सचिव पी. एस. मीना, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, कोकण विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, विकास खारगे, द योगा इन्स्टिटट्यूूटच्या संचालक हंसा जयदेव योंगेद्र आदींसह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
जागतिक योग दिनानिमत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस दलातील जवानांसोबत योगासने केली. वांद्रे येथील प्रोमोनेड परिसरात स्पंदन आर्ट आणि मुंबई पोलिसांच्यावतीने योग दिन साजरा करण्यात आला.
मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात योग दिनाचा ठराव मांडला तेव्हा त्याला १५० हून अधिक देशांचा पाठिंबा मिळाला. समान विचारधारा असलेल्या जगातील सर्व देशांनी योग स्वीकारला आहे. जगभर १७० पेक्षा जास्त देशांमध्ये योग दिवस साजरा होत आहे. भारतानेही मागील ५-६ वर्षांपासून योग चिकित्सा पद्धती सुरू केली आहे. योग चिकित्सा पद्धतीमुळे स्वस्थ जीवन जगण्यास मदत होते.
या योगदिनी निरायम आयुष्यासाठी आपण सगळे योग करू या आणि सगळे जग निरामय करू या, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार, दिग्दर्शक मधुर भांडारकर, प्रसिद्ध गायक शान, महापालिका आयुक्त अजय महेता, मुंबई पोलीस सहआयुक्त देवेन भारती, संगीतकार जतीन ललीत आदी सेलीब्रिटींसह सुमारे एक हजार पोलीस जवान, विशेष मुले आणि सामान्य नागरिक सहभागी झाले होते.