पोलीस अधीक्षक कार्यालयात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Published: June 11, 2016 02:50 AM2016-06-11T02:50:32+5:302016-06-11T02:50:32+5:30
अकोला येथील घटना; ठाणेदाराने दखल न घेतल्याने घेतले विष.
अकोला: पोलीस अधीक्षक कार्यालयात सोबत आणलेले विष प्राशन करुन युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ११.४0 वाजता घडली. हा प्रकार पोलीस कर्मचार्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने युवकाला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. डाबकी रोड ठाणेदारांनी एका प्रकरणामध्ये आरोपींवर कारवाई न केल्यामुळे व्यथित होऊन या युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सदानंद सारंगधर धानोरकार(३५) याच्या पत्नी व मुलांना परिसरातील काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी मारहाण केली आणि विनयभंग केला. याप्रकरणी त्याच्या पत्नीने डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. यानंतर आरोपींची जामिनावर सुटका झाली. आरोपी सदानंद धानोरकार व त्याच्या कुटुंबाला त्रास देऊ लागले. याची तक्रार त्याने पोलीस ठाण्यात करून आरोपींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, उलट ठाणेदाराने त्याला शिवीगाळ केली. यामुळे सदानंद व्यथित झाला होता. शुक्रवारी तो पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार देण्यासाठी आला. यावेळी त्याने सोबत कीटकनाशकाची बॉटलसुद्धा सोबत आणली होती. सदानंद धानोरकार याने पोलीस अधीक्षक कार्यालयातच विषारी द्रव्य प्राशन केले. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. मुख्यालयातील पोलीस कर्मचारी आळुराम पवार यांच्या तक्रारीवरून सदानंदविरुद्ध भादंविच्या कलम ३0९ अन्वये गुन्हा दाखल केला.