VIDEO: राज ठाकरेंवर टीका करणाऱ्याला काढायला लावल्या उठाबशा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 05:35 PM2019-01-04T17:35:13+5:302019-01-04T18:14:59+5:30
तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल
पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर केलेली टीका एका व्यक्तीला महागात पडली. राज ठाकरेंवरफेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह टीका करणाऱ्या तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी उठाबशा काढायला लावल्या. मनसे कार्यकर्त्यांनी या उठाबशांचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला. एखाद्या व्यक्तीनं राज ठाकरेंवर टीका केली, तर त्याला अशाच प्रकारे धडा शिकवला जाईल, अशी धमकीदेखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिली.
राज ठाकरेंवर आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका करणाऱ्या व्यक्तीचं नाव रोहित बोराडे असं आहे. आपण राज यांच्यावर अयोग्य शब्दांमध्ये टीका केल्याची कबुली प्रवीणनं दिली. मी राज ठाकरेंवर अशा पद्धतीनं टीका करायला नको होती, असंदेखील त्यानं म्हटलं. अद्याप या प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
त्या व्हिडीओत नेमकं काय?
मनसे कार्यकर्त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काही कार्यकर्ते प्रवीण बुरेडा नावाच्या तरुणाच्या घरात दिसत आहेत. 'हा मुलगा गरीब आहे. याला आई-बाबा नाहीत. अशा परिस्थितीत हा ठाकरे साहेबांविरोधात फेसबुकवर वाईट पद्धतीनं लिहितो. कोणीही व्यक्ती राज ठाकरेंविरोधात काहीही चुकीचं म्हणेल किंवा फेसबुकवर त्यांच्या विरोधात लिखाण करेल, तर आम्ही त्याला अशाच पद्धतीनं शिक्षा करु,' अशी धमकी या व्हिडीओच्या माध्यमातून देण्यात आली आहे.