वेळेत अर्ज न करू शकलेल्या तरुणास मिळाली परीक्षेची संधी
By admin | Published: June 20, 2017 02:39 AM2017-06-20T02:39:11+5:302017-06-20T02:39:11+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) वेबसाइट ऐनवेळी हँग झाल्याने आॅनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) वेबसाइट ऐनवेळी हँग झाल्याने आॅनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ठरलेल्या मुदतीत पूर्ण न करू शकलेल्या मराठवाड्यातील एका तरुणाला रविवारी झालेली नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा देण्याची संधी उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे मिळाली.
औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील बिडकिन येथील गणेश नगरात राहणाऱ्या या सुदैवी तरुणाचे नाव संदीप अंबादास काळे असे आहे. आॅनलाइन अर्ज वेळेत दाखल न झाल्याचे कारण देऊन ‘यूपीएससी’ने संदीपला या परीक्षेस प्रवेश नाकारला होता. याविरुद्ध त्याने केलेली याचिका औरंगाबाद येथील न्या. अनूप मोहता व न्या. सुनिल कोतवाल यांच्या खंडपीठाने मंजूर केली व संदीपला लगेच ई- हॉल तिकिट जारी करावे, असा आदेश दिला.
वेबसाइट हँग झाल्याने संदीप स्कॅन केलेली त्याची स्वाक्षरी व छायाचित्र अपलोड करू शकला नव्हता. यूपीएससीने त्याची स्वाक्षरी व छायाचित्र परीक्षा केंद्रावर स्वीकारण्याची व्यवस्था करावी व त्याला औरंगाबाद केंद्रात परिक्षेला बसू द्यावे, असाही आदेश न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या या आदेशामुळे रविवारी १८ जून रोजी झालेली ही परीक्षा देण्याची, त्याची कोणतीही चूक नसूनही हुकलेली संधी मिळाली.
या परीक्षेसाठी आॅनलाइन भरण्याची मुदत १७ मार्च रोजी सा. ६ वाजेपर्यंत होती. संदीपने या शेवटच्या दिवशी मुदत संपण्याच्या तासभर आधी आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केली. बाकी सर्व माहिती भरून झाली, परीक्षा शुल्क आॅनलाइन भरून झाले आणि सा. ५.१२ च्या सुमारास फक्त स्कॅन केलेली स्वाक्षरी व छायाचित्र अपलोड करण्याचे शिल्लक असताना युपीएससीची साइट हँग झाली. सा. ६ ची अंतिम मुदत टळून गेली तरी वेबसाइटमधील तांत्रिक बिघाड दूर झाला नाही आणि संदीपचे अर्ज दाखल करणे अर्धवट राहिले. संदीपने त्या दिवशी सा. ६.२४ व पुन्हा रात्री १०.४३ वाजता युपीएससीच्या अध्यक्षांना तातडीने ई-मेल करून ही अडचण निदर्शनास आणली. परंतु युपीएससीने त्याची कोणतीही दखल न घेता संदीपने वेळेत अर्ज केला नाही, असे ठरवून त्यास परीक्षेला बसू दिले नाही.
न्यायालयाने म्हटले की, एरवी आम्ही अशी ऐनवेळी केलेली याचिका ऐकलीही नसती. परंतु अशी अडचण इतरही अनेकांना आली असेल व अशा वेळी उमेदवार काहीच करू शकत नाही. त्यामुळे परिक्षेची संधी हुकून करीयर वाया जाऊ नये यासाठी आम्ही हा आदेश देत आहोत. या सुनावणीत अर्जदारासाठी अॅड. जीवन जे. पाटील यांनी तर केंद्र सरकार व युपीएससीतर्फे अॅड. दिपाली जपे यांनी काम पाहिले.
यूपीएससीचा बचाव अमान्य
यूपीएससीने इतर मुद्द्यांखेरीज असाही बचाव घेतला की, उमेदवाराने अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या तासापर्यंत न थांबता आधी अर्ज भरला असता तर ही वेळ आली नसती. परंतु न्यायालयाने म्हटले की, आदर्श स्थितीमध्ये हे म्हणणे बरोबर असले तरी मुदतीच्या शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज भरता येऊ शकतो हेही नाकारता येणार नाही. याशिवाय त्यादिवशी वेबसाईट हँग झाल्याचा मोघमपणे केलेला इन्कार व उमेदवाराने लगेच केलेल्या ई-मेलची दखल न घेणे यावरूनही खंडपीठाने युपीएससीच्या प्रतिकूल भाष्य केले.