गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू; नायगांव तालुक्यातील भोपाळा येथील दुर्दैवी घटना
By हितेंद्र.सिताराम.काळुंखे | Published: September 9, 2022 07:14 PM2022-09-09T19:14:56+5:302022-09-09T19:25:31+5:30
नायगाव तालुक्यातील भोपाळा येथील सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तरुण युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क नायगांव
नायगाव तालुक्यातील भोपाळा येथील सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तरुण युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि.९ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.
सविस्तर माहिती अशी की दर वर्षी प्रमाणे याहीवर्षी बसवण्यात आलेल्या सार्वजनिक युवा गणेश मंडळ गणपतीचे विसर्जन करण्यासाठी दि.९ सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास गावाशेजारी असलेल्या पाझर तलावात गणपतीला सोडन्यासाठी पाण्यात उतरलेल्या शिवकुमार बाबुराव हत्तीनगरे वय 20 वर्ष या तरुण युवकाचा पाझर तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यातील गाळात बसून तो पाण्यात अडकल्याने गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरुण युवकाची एकच धांदल उडाली होती. गणपती सोडण्यासाठी गेलेला तरुण युवक पाण्यात फसला ह्या घटनेची माहिती माजी सरपंच आनंदराव पाटील बावणे यांनी रामतीर्थ पोलिस व तहसील प्रशासनाला कळवली. रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी संकेत दिघे यासह पोलीस कर्मचारी व नायगाव तहसीलचे तहसीलदार गजानन शिंदे, तलाठी विजय पाटील यासह गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन पाण्यात फसलेल्या युवकाला पाण्याबाहेर काढण्यासाठी तब्बल दीड तास प्रयत्न केले परंतु अनेकांना तो हाताला लागत नसल्याने हनमंत हत्तीनगरे, बाबुराव हातीनगरे, व्यंकट हातीनगरे , आनंदा मष्णाजी कोठेवाढ यांनी गळाच्या साह्याने पाण्यात फसलेल्या तरुणाला बाहेर काढण्यात यशस्वी झाले परंतु तब्बल दीड तास पाण्यात अडकल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सदरील घटनेचा रामतीर्थ पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी नायगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवून दिले असून या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे भोपळा व शंकर नगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिवकुमार हत्तीनगरे हा एकुलता एक मुलगा होता तो शंकरनगर येथील गोदावरी मनार कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता त्यांच्या या अकाली निधनामुळे आई वडिलांचा आधार गेला असून त्यांच्या वयोवृद्ध आई-वडिलास शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून केल्या जात आहे.