चीनमधील कोरोनाग्रस्त भागात मीरा रोडची तरुणी, तरुण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 06:02 AM2020-02-16T06:02:27+5:302020-02-16T06:02:37+5:30
संडे अँकर । व्हिडीओद्वारे पालकांशी संपर्क : केंद्राने सुटकेसाठी प्रयत्न करावेत
मीरा रोड : जपानजवळ असलेल्या डायमंड प्रिन्सेस या जहाजावर मीरा रोडची सोनाली ठक्क र, तर आकाश पाठक हा चीनमध्ये वयहान शहराजवळ कोरोनामुळे अडकून पडले आहेत. दोघांना कोरोनाची लागण झालेली नसली तरी लागण होण्याच्या भीतीने सरकारने तातडीने येथून सुटका करून मायदेशी आणावे, अशी मागणी त्यांनी व्हिडीओद्वारे केली आहे.
मीरा रोडच्या बेव्हर्ली पार्क भागातील मेरी गोल्ड - ३ मध्ये राहणारी सोनाली (२४) ही जपानजवळच्या डायमंड प्रिन्सेस जहाजावर अडकली आहे. ती जहाजावर सुरक्षा अधिकारी म्हणून काम करते. डिसेंबरपासून ती जहाजावर आहे. सोनालीने व्हिडीओद्वारे मदतीचे आवाहन सरकारला केले आहे. सुरुवातीला जहाजावर १० जणांना लागण झाली होती, ती संख्या आता २८९ इतकी झाली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस जहाजावरच ठेवले गेले तर आम्हालाही कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. बुधवारी तपासणी झाली असून त्याच्या अहवालाची वाट बघत आहे. डॉक्टर व तपासणी यंत्रणांची संख्या कमी असल्याने दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.
चार दिवसांपासून मला एका केबिनमध्ये एकाकी ठेवले आहे. माझे पालक काळजीत आहेत. पण, नक्कीच आम्हाला मदत मिळेल, अशी आशा तिने व्यक्त केली आहे. सोनालीच्या कुटुंबीयांनी तिचा व्हिडीओ टिष्ट्वटरवर शेअर करून मदतीचे आवाहन केले आहे.
तिचे वडील दिनेश ठक्कर यांनी सांगितले की, आम्ही सर्व खूपच चिंतेत आहोत. सोनालीशी आम्ही रोज व्हिडीओ कॉलवरून बोलतो.
जर केंद्र सरकार वुहानमध्ये अडकलेल्यांना सुरक्षित आणू शकते तर मग दूर जपानला जहाजावर अडकलेल्या भारतीयांची मदत का करत नाही?
आकाश चीनमधील एका विद्यापीठात प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करतो. कोरोनामुळे आकाश सात दिवस एका खोलीत राहत असून दिवसेंदिवस येथील परिस्थिती बिकट होत असून मायदेशी परतण्याची विनंती केली आहे.
मदतीसाठी आवाहन केले
मीरा रोडचा आकाश हा चीनमधील वुहान प्रांताजवळच्या हेनान प्रोर्विस शहरात अडकला आहे. आकाशनेही व्हिडीओमार्फत तेथील परिस्थिती दाखवत मदतीसाठी आवाहन केले
आहे.