तरुणाची निर्घृण हत्या
By admin | Published: May 13, 2015 02:03 AM2015-05-13T02:03:16+5:302015-05-13T02:03:16+5:30
कांदिवली पूर्वच्या पोईसर परिसरात एका २४वर्षीय तरुणाची हत्या सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. बहिणीच्या छेडछाडीतून झालेल्या
मुंबई : कांदिवली पूर्वच्या पोईसर परिसरात एका २४वर्षीय तरुणाची हत्या सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. बहिणीच्या छेडछाडीतून झालेल्या वादात या तरुणाला जीव गमवावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र त्याच्या मारेकऱ्यांना अवघ्या काही तासांतच जेरबंद करण्यात समतानगर पोलिसांना यश आले आहे.
अनिस सय्यद असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या शेजारीच उदय मंडल (२२) आणि विकास मंडल (२८) हे दोघे भाऊ राहतात. अनिसचा जावेद नावाचा एक मित्र आहे. जावेद हा मंडळ यांच्या बहिणीची छेडछाड करत असल्याचा त्यांचा आरोप होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी जावेदची समजूत काढण्यासाठी उदयने त्याला बोलावले. त्या वेळी सोबत असलेल्या अनिसने उदयला धक्काबुक्की केली. त्याचा राग त्याच्या मनात होता. समतानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, उदय आणि विकास यांनी अनिसला सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास पोइसर परिसरात अडवले. या ठिकाणी त्यांची बाचाबाची झाली. तेव्हा त्यांनी रस्त्यावरील एक पेव्हर ब्लॉक उचलून तो अनिसच्या डोक्यात घातला. त्याला जखमी अवस्थेत सोडून त्यांनी घटनास्थळाहून पळ काढला. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना कळवून नंतर अनिसला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)