गरिबांच्या हितासाठी ‘युवा’चा उपक्रम
By admin | Published: March 4, 2017 01:53 AM2017-03-04T01:53:48+5:302017-03-04T01:54:45+5:30
शहरी उपजीविका मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरी रोजगार योजना गरिबांपर्यंत पोहोचविण्यासाठी युवा संस्थेने पुढाकार घेतला आहे.
मुंबई : पंडित दीनदयाळ अंत्योदय योजना आणि महाराष्ट्र राज्य शहरी उपजीविका मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरी रोजगार योजना गरिबांपर्यंत पोहोचविण्यासाठी युवा संस्थेने पुढाकार घेतला आहे. योजनेच्या फायद्यांसह त्यातील तरतुदी समजून सांगण्यासाठी ‘युवा’ने शनिवार, ४ मार्च रोजी दुपारी २ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात महिला, युवक, फेरीवाले आणि बेघर समूहांसोबत शिबिराचे आयोजन केले आहे.
युवाच्या समन्वयक पूजा यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिबिराच्या दृष्टीने सदर मिशनबाबत शहरी गरिबांमध्ये जनजागृती केली जाईल. स्थानिक स्तरावर या योजनेची माहिती दिली जाईल. राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांमध्ये दुवा म्हणून युवा काम करणार आहे. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा उपयोग होईल; शिवाय या योजनेची योग्य अंमलबजावणी करण्याचा प्रयत्नही युवामार्फत केला जाईल.
सध्या शहरी गरिबांच्या प्रश्नांना घेऊन युवाचे काम सुरू आहे. सर्वांना मानवी अधिकाराच्या दृष्टीने संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना यशस्वी करण्याचे ध्येय युवाने हाती घेतले आहे. स्मार्ट सिटीआधी सर्वसमावेशी शहर तयार करण्याची गरजही संस्थेने व्यक्त केली आहे.
त्यासाठी प्रयत्न करताना असंघटित कामगारांच्या उपजीविकांचे संरक्षण आणि प्रसार करणे, त्यांना सुरक्षा व प्रतिष्ठा प्राप्त करून देणे यावर संस्थेचे लक्ष आहे. तेव्हाच शाश्वत विकास होऊन सर्वसमावेशक शहर निर्माण होईल, असेही यादव यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. (प्रतिनिधी)