‘शिवोत्सवा’त तरुणाई आजपासून रंगणार
By admin | Published: February 10, 2017 12:28 AM2017-02-10T00:28:30+5:302017-02-10T00:28:30+5:30
शिवाजी विद्यापीठ सजले : देशभरातील विद्यार्थी कलाकारांच्या स्वागतासाठी सुरू आहे लगबग
कोल्हापूर : ‘शिवोत्सव’ या ३२ व्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय युवा महोत्सवात आज, शुक्रवारपासून पाच दिवस देशभरातील तरुणाईचा कलाविष्कार बहरणार आहे. यासाठी शिवाजी विद्यापीठ सजले आहे. महोत्सवाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी विद्यापीठात तयारीची लगबग सुरू होती.
केंद्र सरकारच्या क्रीडा व युवा मंत्रालय, भारतीय विद्यापीठ महासंघ (एआययू) आणि शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘शिवोत्सव’ हा लोकनृत्य, पाश्चिमात्य नृत्य, संगीत, वादविवाद, एकांकिका, लोककला, आदी प्रकारांमध्ये रंगणार आहे. त्यात देशभरातील ८० हून अधिक विद्यापीठांमधील सुमारे १३०० विद्यार्थी कलाकार भारतीय कला-संस्कृतीचे दर्शन घडविणार आहेत.
महोत्सवाचा प्रारंभ आज, शुक्रवारी दुपारी तीन वाजता सहभागी संघांच्या शोभायात्रेने होणार आहे. विद्यापीठाची मुख्य इमारत, मुलींचे वसतिगृह, सायबर चौक, माऊली चौक, चांदीचा गणपती मंदिर (शाहूनगर), प्रतिभानगर, मालती अपार्टमेंट, एनसीसी भवन ते लोककला केंद्र असा शोभायात्रेचा मार्ग आहे. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता लोककला केंद्रात महोत्सवाचे उद्घाटन शाहू छत्रपती, चित्रपट अभिनेते सचिन खेडेकर, ‘एआययू’चे सहसचिव डॉ. डेव्हिड सॅम्पसन, प्रभारी कुलगुरू डॉ. डी. आर. मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.
दरम्यान, विद्यापीठाकडून गुरुवारी स्वागतकमान उभारणी, मुख्य इमारतीची रंगरंगोटी-स्वच्छता, महोत्सवाचे उद्घाटन, विविध सभागृह, खुला मंच सज्जतेची तयारी वेगाने सुरू होती. रात्री उशिरापर्यंत तयारीची लगबग सुरू होती. महोत्सवातील सहभागी संघांच्या स्वागतासह त्यांना विद्यापीठात आणण्यासाठी रेल्वे स्थानकापासून एनएसएसचे स्वयंसेवक, विद्यापीठातील कर्मचारी कार्यान्वित होते. आकर्षक विद्युत रोषणाईने विद्यापीठाची मुख्य इमारत झळाळून निघाली होती. प्रभारी कुलगुरु डॉ. डी. आर. मोरे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यापीठ विद्यार्थी कल्याण
मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही.
गुरव आदींनी पाहणी केली. (प्रतिनिधी)
परिसरात फेरफटका, तालीम रंगली
या महोत्सवासाठी गुरुवारी सायंकाळी ६ पर्यंत ६९ विद्यापीठांच्या संघांनी नोंदणी केली. सकाळी दहा वाजल्यापासून विद्यापीठात संघांचे आगमन होऊ लागले. दिवसभरात मणिपूर, चेन्नई, अमृतसर, म्हैसूर, पद्मावती युनिव्हर्सिटी, कुरूक्षेत्र विद्यापीठ, तेजपूर, कालिकत युनिव्हर्सिटी, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती, नागपूर विद्यापीठ आदी संघ दाखल झाले. विद्यापीठात दाखल झालेल्या संघांतील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी निवासाच्या ठिकाणी साहित्य ठेवल्यानंतर परिसरात फेरफटका मारला. काहींंची निवास व्यवस्थेच्या ठिकाणी तालीम रंगली होती.