"कोकणकरांच्या सहनशक्तीला सलाम"; मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे नरक यातना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 11:09 AM2023-08-04T11:09:52+5:302023-08-04T11:10:37+5:30
गेल्या २० वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. २० वर्ष म्हणजे ४ टर्म तुम्ही निवडून देताय. बापरे, हा सहनशक्तीचा अंत आहे असं युट्यूबर जीवन कदमनं म्हटलं आहे.
मुंबई – पावसामुळे महामार्गावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असल्याचे दिसून येते. त्यात मुंबई-गोवा महामार्ग म्हणजे खड्ड्यांसाठी पर्वणी. गेल्या १७ वर्षाहून अधिक काळ या महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. परंतु अद्याप रस्ता पूर्ण झाला नाही. परंतु जो रस्ता आहे त्यावर खड्ड्यांची चाळण झाल्याचे दिसून येते. मराठी युट्यूबर जीवन कदमने या रस्त्यावरून जाताना आलेला अनुभव शेअर केला आहे.
जीवन कदम म्हणतो की, कोलाडहून मुंबईच्या दिशेने येताना रस्त्यावरील खड्यांमुळे माझी कार आपटली. त्यात टायर फुटला. रिंग बाहेर आली, व्हिल मोडली. माझ्यासह अन्य एका प्रवाशाच्या वाहनाचीही हीच अवस्था झाली. खड्ड्यांमुळे त्यांचाही टायर फुटला. मी लाईव्ह ही दृश्य दाखवतोय असं सांगत जीवनने खड्ड्यामध्ये उतरून तो किती मोठा आहे हे लोकांना दाखवले. त्यानंतर तुम्ही या लोकांना का मते देता? असा संतप्त सवालही त्याने विचारला.
त्याचसोबत गेल्या २० वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. २० वर्ष म्हणजे ४ टर्म तुम्ही निवडून देताय. बापरे, हा सहनशक्तीचा अंत आहे. कोकणकरांनो तुम्हाला हॅट्सऑफ आहेत असंही जीवन कदमनं सांगितले. जीवनचा हा व्हिडिओ मनसेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. मनसेने म्हटलंय की, आपलं कोकण स्वर्गाहून सुंदर आहे असं म्हणतो, पण कोकणात जाताना भ्रष्टासुरामुळे वाटसरुंना नरकयातना भोगाव्या लागत आहेत असं त्यांनी सांगितले. मनसेने खड्डे भ्रष्टाचाराचे अड्डे, पाहा आणि थंड बसा अशा आशयाची मोहिम सोशल मीडियावर सुरू केली आहे. त्यातून जनतेला होणाऱ्या खड्ड्यांच्या त्रासाबाबत विविध बातम्या, लेख, व्हिडिओ पोस्ट करण्यात येत आहेत.
आपलं कोकण स्वर्गाहून सुंदर आहे असं म्हणतो पण कोकणात जाताना भ्रष्टासुरामुळे वाटसरूंना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. मराठी युट्युबर जीवन कदम यांना आलेला अनुभव. #खड्डे_भ्रष्टाचाराचे_अड्डे : पहा आणि थंड बसा ! pic.twitter.com/Wp1rHAShuc
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 4, 2023
राज ठाकरेंनी केली होती टीका
अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले होते. राज ठाकरे म्हणाले होते की, राज्यात अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेत, वाहतूक कोंडी होते. अनेक तास ताटकळत राहावे लागतात. तुम्ही कसले टोल वसूल करताय? ही मनमानी सुरू आहे त्यावर भाजपा काय बोलणार का? १७ वर्ष मुंबई-गोवा महामार्ग तयार होतोय. किती वर्ष चालणार? रस्ते बांधणीबाबत केंद्रातला मंत्री मराठी आहे आणि महाराष्ट्रातले रस्ते खराब आहेत यापेक्षा दुदैव नाही असा टोला राज यांनी लगावला होता.