युगला बेशुद्धावस्थेत सोडले बाभुळखेड्याच्या नाल्यात

By admin | Published: September 5, 2014 01:12 AM2014-09-05T01:12:57+5:302014-09-05T01:12:57+5:30

आपण युग चांडक याला पाटणसावंगी नजीकच्या बाभुळखेड्याच्या नाल्यात बेशुद्धावस्थेत सोडून आल्याची कबुली आरोपी क्रूरकर्मा राजेश दवारे याने पोलिसांकडे घटनेच्या दुसऱ्या दिवशी दिली होती,

Yuga left in unconscious state at the bank of Balbhikheda | युगला बेशुद्धावस्थेत सोडले बाभुळखेड्याच्या नाल्यात

युगला बेशुद्धावस्थेत सोडले बाभुळखेड्याच्या नाल्यात

Next

क्रूरकर्मा राजेशने दिली होती कबुली
नागपूर : आपण युग चांडक याला पाटणसावंगी नजीकच्या बाभुळखेड्याच्या नाल्यात बेशुद्धावस्थेत सोडून आल्याची कबुली आरोपी क्रूरकर्मा राजेश दवारे याने पोलिसांकडे घटनेच्या दुसऱ्या दिवशी दिली होती, असे आज सूत्रांकडून सांगण्यात आले.
वस्तुत: राजेश आणि त्याचा मित्र अरविंद सिंग यांनी युगचे १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अपहरण केल्यानंतर त्याच दिवशी त्याचा खून केला होता. मात्र युग बेशुद्ध असल्याची खोटी माहिती त्याने दिली होती. २ सप्टेंबरच्या सायंकाळी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान राजेशने गणेशपेठ पोलीस ठाण्यात ही कबुली दिली होती. राजेशच्या कबुलीनंतर पोलिसांच्या अन्य एका पथकाने त्याचा मित्र अरविंद याला शिकवणी वर्गातून ताब्यात घेतले होते. राजेशला पोलिसांनी १ सप्टेंबरच्या सायंकाळीच चौकशीसाठी बोलावलेले होते. तो पोलीस ठाण्यात असतानाच अरविंदने क्वाईन बॉक्सवरून मोहसीन खान बोलत असल्याचे सांगून १० कोटींची खंडणी मागितली होती. २ सप्टेंबर रोजी पोलिसांनी राजेश आणि अरविंद यांना अटक केली होती. आरोपींनी कबुली दिल्यानंतर त्यांनीच घटनास्थळ दाखवितो, असे सांगून पोलीस पथकाला बाभुळखेड्याच्या नाल्यात नेले होते.
पुन्हा राजेशचे घूमजाव
नाल्यात युगचा मृतदेह आढळल्यानंतर पुन्हा राजेशने घूमजाव केले होते. आपण बेशुद्ध युगला अरविंदच्या ताब्यात दिले होते. तोच युगला घेऊन पुलाखाली उतरला होता आपण वरच होतो, असे सांगून राजेशने आपले कृत्य पूर्णत: अरविंदच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला होता, असेही सूत्राकडून सांगण्यात आले.
‘ त्या’ महिला डॉक्टरची
शिफारस ठरली घातक
डॉ. मुकेश चांडक यांच्या क्लिनिकमध्ये राजेश हा आठ-दहा महिन्यापासून नोकरीवर लागला होता. त्याला नोकरीवर घेण्याची शिफारस चांडक यांची सहकारी महिला डॉक्टरने केली होती. त्यामुळे त्याच्याकडे देवाणघेवाणीचे काम देण्यात आले होते. युग बेपत्ता झाल्याचे समजल्यानंतरही डॉ. चांडक यांनी राजेशवर थेट शंका घेतली नव्हती. उलट ड्रायव्हरवर शंका घेतली होती. चांडक यांनी ड्रायव्हरला २५ हजार रुपये उसने दिले होते. परंतु तो बरोबर परतफेड करीत नव्हता. या पैशासाठी ड्रायव्हरनेच युगचे अपहरण केले असावे, अशी शंका चांडक यांनी व्यक्त केली होती, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.
‘त्या’ पुलावर तो नेहमीच
न्यायचा मैत्रिणींना
बाभुळखेडा आणि लोणखैरी येथील नाल्यावरील पुलांच्या निर्जन ठिकाणी राजेश हा नेहमी आपल्या नवनवीन मैत्रिणींना घेऊन जायचा. त्याला येथील ठिकाणांची इत्थंभूत माहिती होती, त्यामुळेच त्याने युगच्या विल्हेवाटीसाठी सुरक्षित असलेल्या या ठिकाणाची निवड केली होती, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: Yuga left in unconscious state at the bank of Balbhikheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.