युतीच्या प्रचाराचा नारळ ‘अंबाबाई ’ला साक्षी ठेवून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 08:06 PM2019-03-19T20:06:06+5:302019-03-19T20:24:00+5:30
२४ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह युतीचे सगळे खासदार, आमदार व संघटनात्मक पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
पुणे : साडेचार वर्षांच्या खडाखडीनंतर झालेल्या भारतीय जनता पार्टी-शिवसेनेच्या युतीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ यावेळी कोल्हापूरला अंबाबाईच्या चरणी वाढवण्यात येणार आहे. २४ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह युतीचे सगळे खासदार, आमदार व संघटनात्मक पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. पुण्यातूनही या कार्यक्रमासाठी अनेकजण जाणार असून त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी ही माहिती दिली. पुण्यातील खासदार, आमदार यांच्याबरोबरच संघटनेतील तसेच पुणे महापालिकेतील अनेक पदाधिकारी कोल्हापूरला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईचे आशिर्वाद घेऊन युती राज्यातील आपल्या प्रचारास सुरूवात करणार आहे. दोन्ही पक्षांचे उमेदवार जाहीर होण्यास विलंब होत आहे, त्यामुळे कार्यकर्ता स्तरावर आलेली शिथिलता कोल्हापूरला सुरूवात करणार असल्यामुळे निघून जाईल असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरूवात भाजपाने थेट रायगड गाठून छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन केली होती. शिवसेनेबरोबरची युती त्यावेळी तुटली होती. त्यामुळे या गोष्टीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. छत्रपतींचा आशीर्वाद घेत आहोत अशाी त्याची जाहिरात केली गेली. त्यानंतर पुणे महापालिकेच्या निवडणूकीचा प्रचार भाजपाने सिंहगड ला जाऊन शहर विकासाची शपथ घेऊन केली. त्यालाही जोरदार प्रसिद्धी मिळाली. आता यावेळी कोल्हापूरची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूरची अंबाबाई महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे. त्यामुळे कोल्हापूर निवडण्यात आले असे भाजपा वर्तुळात सांगण्यात आले.
दरम्यान पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी कोणाला हे निश्चित होत नसले तरीही त्याचा भाजपा संघटनेवर काहीही परिणाम झालेला नाही. संघटनेच्या बैठका, प्रचाराचे नियोजन, बूथ कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, मतदार याद्यांचे परीक्षण अशी सर्व कामे सुरू असून त्याबरोबरच पक्षाच्या केंद्रीय तसेच राज्य शाखेने दिलेले जाहीर कार्यक्रमाही नियमाने करण्यात येत आहेत. लोकसभेच्या एकूण १ हजार ९४४ मतदान केंद्रांवर मिळून तब्बल १९ हजार कार्यकर्त्यांची एक मोठी फळीच भाजपाने तयार केली आहे. त्यांच्याबरोबर संघटनेकडून नियमीत संपर्क केला जात असतो.