मुख्यमंत्र्यांआधी आदित्य ठाकरेंची यात्रा; 'जन आशीर्वाद' घेत महाराष्ट्र पिंजून काढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 12:36 PM2019-07-10T12:36:05+5:302019-07-10T12:44:10+5:30
विधानसभा निवडणुकीआधी आदित्य ठाकरेंची महत्त्वपूर्ण यात्रा
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. आदित्य ठाकरे येत्या शुक्रवारपासून 'जन आशीर्वाद यात्रे'ला सुरुवात करणार आहेत. अंबाबाईच्या दर्शनानंतर कोल्हापूरातून या यात्रेला सुरुवात होईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांची ही यात्रा शिवसेनेसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १ ऑगस्टपासून विकास यात्रा काढणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वातावरण निर्मिती करुन पाच वर्षातील कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून केला जाणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांची विकास यात्रा सुरू होण्याआधीच आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करतील. येत्या शुक्रवारपासून या यात्रेला आरंभ होईल. कोल्हापूरातील अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन या यात्रेला सुरुवात होईल. कोल्हापूरातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळालं आहे.
लोकसभा निवडणुकीत भरभरुन मतदान करणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी आणि मतदान न केलेल्यांची मनं जिंकण्यासाठी आदित्य ठाकरे 'जन आशीर्वाद यात्रा' काढणार आहेत. सध्या शिवसेना, भाजपामध्ये सगळं काही आलबेल असल्याचं दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. मात्र तरीही शिवसेना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणाच्या मनस्थितीत नाही. २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक एकत्र लढणाऱ्या शिवसेना, भाजपाची युती विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुटली होती. हा धोका टाळण्यासाठी शिवसेना कामाला लागली आहे.