Maharashtra Politics: “बऱ्या बोलाने शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी द्या, नाहीतर महाभारत होईल”; शिंदे गटाला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 03:21 PM2022-09-21T15:21:21+5:302022-09-21T15:22:13+5:30
Maharashtra News: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील शिवसैनिक लाखोंच्या संख्येने शिवतीर्थावर उपस्थित राहणार असल्याचे युवासेनेकडून सांगण्यात आले.
Maharashtra Politics:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नाही. यातच शिंदे गटाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. यातच दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेना आमने-सामने ठाकले आहेत. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे, यासाठी उद्धव शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यातच युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर सडकून टीका करत, दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मिळाले नाही, तर राज्यात रामायण-महाभारत होईल, असा सज्जड इशारा दिला आहे.
उद्धव सेना ही परंपरेप्रमाणे दरवर्षी प्रमाणे शिवाजी पार्कवरील शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी जाणार आहेत. शिवसैनिक कुणालाही जुमानणार नाहीत. उद्धव ठाकरेंसाठी लाखोंच्या संख्येने शिवतीर्थावर उपस्थित राहण्याचे आवाहन करत, बऱ्या बोलाने शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी द्या, नाहीतर राज्यात रामायण-महाभारत होईल, असा थेट इशारा कोळी यांनी दिला आहे.
शिवसैनिक लाखोंच्या संख्येने शिवतीर्थावर उपस्थित राहणार
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील शिवसैनिक लाखोंच्या संख्येने शिवतीर्थावर उपस्थित राहणार आहेत. सोलापुरातील दहा हजार युवा सैनिक व शिवसैनिक दसरा मेळाव्याला जाणार आहेत. याबाबत युवा सेना व शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे. पोलीस प्रशासनाने किंवा महानगरपालिका प्रशासनाने रोखले तर प्रसंगी कायदा हातात घ्यायला मागेपुढे पाहणार नाही, असे आव्हान कोळी यांनी दिले आहे.
दरम्यान, दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अद्याप परवानगी न दिल्याने शिवसेनेच्या गोटातील अस्वस्थता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने शेवटचा पर्याय म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली. शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी मुंबई महापालिकेविरोधात केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती रमेश धनुका व न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवरील सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे.