Maharashtra Politics: “२५ वर्ष आमदार पण २०० रुपये देत गर्दी जमवली”; वरुण सरदेसाईंची शिंदे गटावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 09:25 PM2022-09-19T21:25:19+5:302022-09-19T21:25:56+5:30
शिंदे गटावर निशाणा साधताना रामदास कदमांनी केलेल्या टीकेला वरुण सरदेसाईंनी प्रत्युत्तर दिले.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले असून, पक्षातील गळती थांबताना दिसत नाही. यातच शिंदे गटाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह युवासेना सचिव वरुण सरदेसाई हेही सक्रीय झाले असून, राज्यभरात दौरे, बैठकांचे सत्र सुरू आहे. यातच २५ वर्ष आमदार होते. पण तरीही २०० रुपये देत गर्दी जमवावी लागली. ऑडिओ क्लिपमधून यासंदर्भातील गोष्टी समोर आल्या आहेत, असा खोचक टोला वरुण सरदेसाई यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना वरुण सरदेसाई म्हणाले की, आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद यात्रा अतिशय उत्तम पद्धतीने सुरू आहे. दोन्ही यात्रांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. राजकारण नसलेले तरुण, युवापिढी आता राजकारणात येऊ इच्छित आहे. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभत आहे. निष्ठावंतांचा भक्कम पाठिंबा शिवसेनेला मिळत आहे. ही गद्दारी केवळ कार्यकर्त्यांना नाही, तर नागरिकांनाही आवडलेली नाही. त्यामुळे आता निवडणुका लागण्याची वाट पाहिली जात आहे. नागरिक आपली भूमिका थेट निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून देतील. सर्वच जण आगामी निवडणुकांची वाट पाहत असल्याचे वरुण सरदेसाई यांनी नमूद केले.
२५ वर्ष आमदार पण २०० रुपये देत गर्दी जमवली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला झालेल्या मोठ्या गर्दीबाबत वरुण सरदेसाई यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, सभांना गर्दी कशी झाली, हे ऑडिओ क्लिपमधून समोर आले आहे. मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला समजले आहे. २५ वर्ष आमदार असलेल्यांना २०० रुपये देऊन गर्दी जमवावी लागली. हे म्हणाले २०० घे, समोरचा व्यक्ती म्हणतो ३०० द्या, ५०० द्या हा सर्व प्रकार सुरू होता, अशा शब्दांत वरुण सरदेसाई यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.
दरम्यान, शिवसेना आणि युवासेनेच्या पुनर्बांधणीसाठी उद्धव ठाकरे ही लवकरच राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत, अशी माहिती वरुण सरदेसाई यांनी दिली. तसेच रामदास कदम यांच्या टीकेला उत्तर देताना, माँसाहेब असतील किंवा रश्मी ठाकरे असतील ज्या व्यक्ती राजकारण नाहीत, त्यांच्याबद्दल त्यांनी बोलू नये, अशी माझी त्यांना विनंती आहे. ते ज्येष्ठ असल्यामुळे मी केवळ विनंती करू शकतो, असे वरुण सरदेसाईंनी सांगितले.