आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात थोडक्यात टळला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 01:32 PM2018-12-19T13:32:37+5:302018-12-19T13:53:44+5:30
कोल्हापुरातील शिवशाहू महाविद्यालयातील कार्यक्रमादरम्यान घडला प्रकार
कोल्हापूर: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमातील अपघात थोडक्यात टळला आहे. आदित्य ठाकरे शाळेच्या मैदानात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देत असताना कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला मंडप अचानक उडाला. आदित्य यांच्या कोल्हापुरातील कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. काही खांब कोसळल्यानं थोडा वेळ गोंधळदेखील उडाला. मात्र सुदैवानं मोठा अपघात टळला.
आज युवासेना कोल्हापूर दौऱ्याच्यानिमित्ताने शिवशाहू महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी आयोजित स्वसंरक्षण शिबिरात विद्यार्थिनींचा सहभाग लक्षणीय होता. त्यांच्यातील आत्मविश्वास आणि चमक बघून मी भारावून गेलो. Self Defence चे हे ट्रेनिंग त्यांच्यातला हाच आत्मविश्वास दृढ करण्यासाठी आहे. pic.twitter.com/pikr43G1sq
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 19, 2018
कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थिंनीसाठी आयोजित करण्यात स्वसंरक्षण शिबिरात सहभाग घेतला होता. शिवशाहू महाविद्यालयातील या शिबिराला जवळपास 2 हजार विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या शिबिरासाठी महाविद्यालयाच्या आवारात मंडप उभारण्यात आला होता. आदित्य विद्यार्थिनींना व्यासपीठावरुन स्वसंरक्षणाचे धडे देत असताना अचानक वाऱ्याचा वेग वाढला. त्यामुळे काही खांब कोसळले आणि मंडप उडाला. यानंतर एकच गोंधळ उडाला आणि घबराट निर्माण झाली. मात्र थोड्याच वेळात परिस्थिती नियंत्रणात आली.
खांब कोसळून मंडप उडाल्यानं विद्यार्थिनी घाबरल्या होत्या. मात्र आदित्य ठाकरेंनी मिश्किल भाष्य करत परिस्थिती हाताळली. 'मीच जादूनं हा मंडप वर नेला होती. मला तुम्हा सगळ्यांची रिअॅक्शन पाहायची होती', अशी मिश्किल टिप्पणी आदित्य यांनी केली. सुदैवानं या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. या कार्यक्रमानंतर आदित्य पुढील कार्यक्रमांसाठी निघाले. याआधी नाशिकमध्ये आदित्य ठाकरेंच्या गाडीचा टायर फुटला होता. सुदैवानं त्यावेळी मोठा अपघात टळला होता.