Maharashtra Politics: “२०२४ च्या निवडणुकीत शिंदे गटाचा सुपडा साफ करणार, तुमच्यात दम असेल तर...”; युवासेना आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 09:18 AM2022-10-10T09:18:12+5:302022-10-10T09:19:05+5:30
Maharashtra News: शिवसेनेशी गद्दारी करत अलीबाबा चाळीस चोरांची टोळी धुमाकूळ घालत असून शिवसैनिक आता गप्प बसणार नाहीत, असा इशारा शरद कोळी यांनी दिला आहे.
Maharashtra Politics: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय वातावरण अधिक तापल्याचे दिसून येत आहे. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष आगामी काळात जास्तच तीव्र होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच हे सगळे भाजपचे षड्यंत्र असून, सन २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत शिंदे गटाला सुपडा साफ करणार असल्याचा इशारा युवासेनेकडून देण्यात आला आहे.
युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी चांगलेच आक्रमक झाले असून, शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यापूर्वीही अनेकदा शरद कोळी यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. आता मात्र शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यावर शरद कोळी यांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. हे तर भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांचे षडयंत्र आहे, असा आरोपही शरद कोळी यांनी केला आहे.
सर्वस्वी जबाबदार भारतीय जनता पक्ष असेल
भविष्य काळात महाराष्ट्र राज्यात शिवसैनिक आक्रमक होतील आणि कायदा व सुवस्थेचे प्रश्न निर्माण होईल आणि याला सर्वस्वी जबाबदार भारतीय जनता पक्ष असेल, असा इशारा देत, सन २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत शिंदे गटाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यात दम असेल तर महाराष्ट्र राज्यात एकत्रित सार्वजनिक व मध्यावधी निवडणूका घ्या. राज्यातील जनता यांना घरी बसवल्या शिवाय राहणार नाही, असे आव्हान शरद कोळी यांनी शिंदे गटासह भाजपला दिले आहे.
दरम्यान, शिवसेनेशी गद्दारी करुन अलीबाबा चाळीस चोरांची टोळी राज्यात धुमाकूळ घालत आहे. या टोळीने भाजपसोबत मिळून शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याच पाप केले आहे. आता शिवसेना व शिवसैनिक गप्प बसणार नाहीत. वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने होतील. कायद्याचा गैरवापर भाजप आणि गद्दार टोळी करत आहेत, अशी टीका शरद कोळी यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"