Maharashtra Political Crisis: “अन्यथा तुम्हाला शिवसेना स्टाइलनेच उत्तर देऊ”; शहाजीबापू पाटलांना शरद कोळींचा थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 09:09 PM2022-09-03T21:09:36+5:302022-09-03T21:12:13+5:30
Maharashtra Political Crisis: शहाजीबापू पाटील मातोश्रीसमोर जाऊन नाक घासत होते, याचा त्यांना आता विसर पडला आहे, या शब्दांत शरद कोळी यांनी सडकून टीका केली आहे.
Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) राज्यभरातून वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. यातच पडत्या काळात पक्षाची बाजू लावून धरणाऱ्या युवासेनेच्या एका नेत्याने शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांच्यावर टीका करत, तुम्हाला शिवसेना स्टाइलनेच उत्तर देऊ, असा इशारा दिला आहे.
युवासेना नेते शरद कोळी यांची युवासेनेच्या राज्य विस्तारकपदी निवड झाल्यापासून, ते सातत्याने शिंदे गटातील मंत्री, आमदारांवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत. यातच शरद कोळी यांनी शहाजीबापू पाटील यांच्यावर बोचरी टीका केली. मात्र, ही टीका करताना शरद कोळी यांची जीभ घसरल्याचे सांगितले जात आहे. ते संत्रा पिऊन बोलताना की हातभट्टीवरील तांब्या मारून बोलतात, नेमके तेच कळत नाही, असे शरद कोळी यांनी म्हटले आहे.
शहाजी बापू पाटील मातोश्रीसमोर जाऊन नाक घासत होते
शहाजीबापू हे त्यांच्याकडे बायकोला लुगडं घ्यायला पैसे नाहीत, असे सांगतात. एवढेच नव्हे तर हातभट्टीची दारु प्यायल्यानंतर शहाजी पाटील त्याचं बिलही दुसऱ्याला भरायला लावतात. ते शहाजीबापू उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना काय घर बांधून देणार, असा टोला लगावत, आमदार होण्यासाठी शहाजीबापू पाटील मातोश्रीसमोर जाऊन नाक घासत होते, याचा आता त्यांना विसर पडला आहे. शहाजी पाटील यांनी वायफळ बडबड बंद करा, अन्यथा तुमच्या घरावर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा देत शरद कोळी यांनी शहाजीबापू पाटील यांच्यावर सडकून टीका केली.
दरम्यान, पडायची प्रॅक्टिस महाराष्ट्रात माझ्याएवढी कुणाची आहे? सात आठवेळा धडाधडा पडलो होतो, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले होते. तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी सांगोल्यात येऊन लोकांची कामे करावी. त्यासाठी दोघांना बंगले भाड्याने घेऊन देतो, अशी टिप्पणी शहाजीबापू पाटील यांनी केली होती.