Maharashtra Politics: “तोंड सांभाळून बोला, उद्धव ठाकरेंना ठणकावणाऱ्यांना ठेचून काढू”; युवासेनेचा शिंदे गटाला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 08:06 PM2022-09-26T20:06:10+5:302022-09-26T20:06:59+5:30
Maharashtra Politics: सत्ता कायमची नसते, सत्ता येते आणि जाते. पण उद्धव ठाकरेंबाबत एकही अपशब्द काढू नये, असा इशारा युवासेनेकडून देण्यात आला आहे.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेला मोठीच गळती लागली आहे. यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) एकमागून एक बैठका, सभा, दौरे यावर भर देत पक्ष वाचवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. यातच आता युवासेनेने शिंदे गटाला थेट इशारा दिला आहे.
राज्याचे मंत्री तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंना ठणकावून सांगतो, गद्दारी तुम्ही केली, दिल्लीला गेले असते तर सत्ता टिकली असती, अशा भाषेत टीकास्त्र केले होते. यावर, युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी तानाजी सावंत यांच्यावर पलटवार करताना शिंदे गटाला इशारा दिला आहे.
उद्धव ठाकरेंबाबत एकही अपशब्द काढू नये
शिंदे गटातील मंत्र्यांनी व पदाधिकाऱ्यांनी तोंड सांभाळून बोलावे. सत्ता कायमची नसते, सत्ता येते आणि जाते. पण उद्धव ठाकरेंबाबत एकही अपशब्द काढू नये. छत्रपती शिवाजी महाराज कधीच दिल्ली समोर झुकले नाहीत. शिवाजी महाराजांना मुघलांकडून अनेकदा बोलावणे आले होते. पण शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी त्यांनी कधीच दिल्ली समोर झुकले नाहीत. उद्धव ठाकरे देखील झुकणार नाही, असे शरद कोळी यांनी ठणकावून सांगितले.
दरम्यान, तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावरून केलेल्या एका वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. तानाजी सावंत यांनी त्या विधानाबाबत माफी मागितलेली असली, तरी महाविकास आघाडीचे नेते तानाजी सावंत आणि शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका करताना पाहायला मिळत आहेत.