कोपरखळ्यांनी रंगला ‘द झेड फॅक्टर’चा सोहळा
By admin | Published: March 5, 2017 02:17 AM2017-03-05T02:17:46+5:302017-03-05T02:17:46+5:30
कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाचे कंत्राट मिळवण्यासाठी सुभाष चंद्रा यांच्या कंपनीने दाखल केलेली याचिका, राज्यसभेचे सदस्यत्व मिळवण्यात त्यांंना आलेले यश
मुंबई : कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाचे कंत्राट मिळवण्यासाठी सुभाष चंद्रा यांच्या कंपनीने दाखल केलेली याचिका, राज्यसभेचे सदस्यत्व मिळवण्यात त्यांंना आलेले यश, एस्सेल वर्ल्डवर लागू झालेल्या मनोरंजन करानंतरही सुरू असलेली यशस्वी घोडदौड; अशा यशापयशाच्या प्रवासात सुभाष चंद्रा यांना शरद पवारांसह नितीन गडकरी आणि राजकीय क्षेत्रातील मित्र कसे मिळाले? अशा काही मैत्रीपूर्वक नात्यांच्या आठवणी रंगल्या त्या राजकीय कोपरखळ्यांमुळे. निमित्त होते ते चंद्रा यांच्या ‘द झेड फॅक्टर - माय जर्नी अॅज द राँग मॅन अॅट द राइट टाइम’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्याचे.
परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये शुक्रवारी राज्यसभेचे खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांच्या आत्मचरित्राच्या मराठी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा राष्ट्रवादीचे संस्थापक-अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रंगला. या वेळी शरद पवार आणि नितीन गडकरी यांनी व्यासपीठावर मारलेल्या राजकीय कोपरखळ्यांना उपस्थितांनी मनमुराद दाद दिली.
शरद पवार म्हणाले, सुभाष चंद्रा यांचे हे आत्मचरित्र म्हणजे पराभव आणि विजयाची गोष्ट आहे. काही पार्श्वभूमी नसताना केलेल्या संघर्षाची ही कहाणी आहे. आव्हानांना आव्हानांनी उत्तर देणारे आणि संघर्षाला संघर्षाने उत्तर देणाऱ्या कथांनी हे पुस्तक भारावले आहे. म्हणून नव्या उद्योजकांना हे पुस्तक प्रेरणादायी आहे. नितीन गडकरी म्हणाले की, सुभाष चंद्रा हे धाडसी निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. चंद्रा यांचे आत्मचरित्र निश्चितच प्रेरणादायी असून, तरुण उद्योजकांना याचा फायदा होईल. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मराठी वाचकांसाठी हे आत्मचरित्र निश्चितच फायदेशीर आहे. ‘मॅनेजमेंट’चे शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आव्हानांना आव्हानांनीच तोंड देतात; तीच माणसे मोठी होतात. सुभाष चंद्रा यांचे हे आत्मचरित्र अशाच आव्हानात्मक कथांनी भरले आहे. चंद्रा यांनी आव्हानांना आव्हानांनीच तोंड देण्याचे काम केले आहे. युवावर्गासाठी हे पुस्तक प्रेरणादायी आहे. (प्रतिनिधी)
...आणि सुभाषजी खासदार झाले
चंद्रा हे राज्यसभेच्या खासदारकीसाठी उभे राहिले तेव्हा ते निवडून येतील की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह होते. आम्ही त्यांना सांगितलेही होते की, तुम्ही उभे राहू नक ज्या दिवशी निवडणूक झाली त्या दिवशीच्या सायंकाळी पंतप्रधानही मला म्हणाले होते की, ‘सुभाषजी निवडून येतील की नाही, याबाबत शंका आहे...’ तेव्हा मीदेखील पंतप्रधानांना हेच म्हणालो होतो. आणि आश्चर्य म्हणजे सुभाषजी राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आले, हा किस्सा नितीन गडकरी यांनी व्यासपीठावर कथन करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला
शहाण्या माणसाने सरकारसोबत धंदा करू नये
सरकार कोणाचेही असो. शहाण्या माणसाने सरकारसोबत धंदा करू नये. कारण उद्योगांसंदर्भातील जटिल प्रक्रियेची नीटशी माहिती नसते. परिणामी यातच वेळ जातो आणि संबंधिताला फटका बसतो, अशी टिप्पणी नितीन गडकरी यांनी केली आणि सभागृहात एकच हशा पिकला.
सुभाष चंद्रा आता राज्यसभेचे खासदार झाले आहेत आणि आता ते ज्येष्ठांच्या सभागृहात ज्येष्ठांचे प्रश्न मांडतील आणि येथे काम करतानाच ते आम्हालाही ज्येष्ठासारखे वागवतील, अशी कोपरखळी शरद पवार यांनी चंद्रा यांना आपल्या भाषणात मारली.
कोणतेच सरकार अपवाद नाही
मनोरंजनाचा विषय आला म्हणजे करही आला. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात कर माफ होतो असे नाही आणि त्याला कोणतेच सरकार अपवाद नाही, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले.