झाकीर हुसेन पडले 'त्या' तबल्याच्या प्रेमात; कर्जतमधील मैफलीतील आठवणींना उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 10:12 IST2024-12-18T10:12:01+5:302024-12-18T10:12:01+5:30
जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचे नुकतेच निधन झाले.

झाकीर हुसेन पडले 'त्या' तबल्याच्या प्रेमात; कर्जतमधील मैफलीतील आठवणींना उजाळा
लोकमत न्यूज नेटवर्क, कर्जत: कर्जत येथील रवी आरेकर आणि जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन हे स्नेही होते. एकदा झाकीर हुसेन कर्जतला आले होते, त्यावेळी संगीत मैफल बसली होती. यावेळी येथील दत्ता हरिश्चंद्रे यांनी बनवलेला एक तबला झाकीर हुसेन यांनी वाजवला आणि ते त्याच्या प्रेमातच पडले. ते तो तबला घेऊन गेले.
जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्त कर्जतमधील त्यांच्या या आठवणीला ज्येष्ठ नागरिक विजय हरिश्चंद्रे यांनी उजाळा दिला. त्यांचे मोठे भाऊ दत्ता हरिश्चंद्रे यांनी तो तबला बनवला होता. झाकीर हुसेन कर्जतला रवी आरेकर यांच्याकडे आले असता ऐनवेळी संगीत मैफिल रंगली होती.
आरेकर यांच्याकडे तबले होते. परंतु त्यांना हवा तसा तबला त्यात नव्हता. त्यामुळे आरेकर यांनी आमच्या बंधूकडू चांगला तबला मिळू शकतो का, अशी विचारणा केली. त्यावेळी एका ग्राहकासाठी तबला बनवला होता, तो वडिलांनी त्यांना दिला आणि ती मैफल रंगली.
दोन दिवसांनंतर संबंधित ग्राहकाने आरेकर यांना तबल्याबाबत विचारले असता, झाकीर हुसेन यांना तो तबला आवडल्याने ते तो घेऊन गेले, असे त्याला सांगितले. हा तबला कर्जत येथील रघुनाथ दगडे यांनी बनवण्यास सांगितला होता. त्यांना हे कळल्यानंतर त्यांनाही आनंद झाल्याचे विजय हरिश्चंद्रे यांनी सांगितले.