गुढीपाडव्याच्या दिवशी झवेरी बाजार बंद
By Admin | Published: April 7, 2016 03:02 AM2016-04-07T03:02:21+5:302016-04-07T03:02:21+5:30
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याची रेकॉर्डब्रेक विक्री करणारा झवेरी बाजार शुक्रवारी बंद राहणार असल्याची माहिती झवेरी बाजार ग्रुप असोसिएशनचे कुमार जैन यांनी दिली आहे. तर मुंबई परिसरात इतर ठिकाणी
मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याची रेकॉर्डब्रेक विक्री करणारा झवेरी बाजार शुक्रवारी बंद राहणार असल्याची माहिती झवेरी बाजार ग्रुप असोसिएशनचे कुमार जैन यांनी दिली आहे. तर मुंबई परिसरात इतर ठिकाणी पाडव्याच्या दिवशी सराफा बाजार खुला राहील की बंद याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे.
अबकारी कराविरोधात पुकारलेला संप गुढीपाडव्यालाही कायम ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. गेल्या वर्षी सराफांनी गुढीपाडव्याला २५० कोटींची उलाढाल केली होती. मात्र दोन दिवसांत संप मागे घेण्याची घोषणा झाली नाही, तर झवेरी बाजारातील सर्व रिटेल आणि होलसेल सराफा दुकाने बंद ठेवून सरकारचा निषेध व्यक्त करतील, असे जैन म्हणाले.
तर सराफांच्या संघटनांची शिखर संघटना असलेल्या जेम्स अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे संचालक अशोक मिनावाला म्हणाले की, गुढीपाडव्याला दुकाने उघडायची की नाही, याचा निर्णय संघटनेने स्थानिक संघटनांवर सोपवला आहे. त्यामुळे किती दुकाने उघडणार हे अनिश्चित आहे.