झेडीपीत ३५९ रुजू नाहीत
By admin | Published: June 13, 2016 03:25 AM2016-06-13T03:25:54+5:302016-06-13T03:25:54+5:30
पालघर जिल्ह्यामध्ये बिन्दुनामावली नुसार ४७९ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
हितेन नाईक,
पालघर- ठाणे जिल्ह्याच्या विभाजना नंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये बिन्दुनामावली नुसार ४७९ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.परंतु पालघर मध्ये त्यातील प्रथमत: ३५९ कर्मचाऱ्यांनी रुजू होण्यास नकार देऊन आपल्या कर्मचारी संघटनांमार्फत प्रशासनावर दबाव टाकण्यास प्रारंभ केला असून त्याला ठाण्यातून मिळणाऱ्या राजकीय पाठबळा मुळे अजूनही हे कर्मचारी पालघर जिल्ह्यात हजर झालेले नाहीत. याचा फटका जिल्हा परिषदे च्या विकासत्मक कामांना बसत आहे. पालकमंत्र्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष या संदर्भात एकजुटीने प्रयत्न करतांना दिसत नसल्याने हया विरोधात शिवसेना आपल्या स्टाइल ने आंदोलन उभे करेल असा इशारा जि.प.सदस्य प्रकाश निकम यांनी दिला आहे.
स्वतंत्र पालघर जिल्हा परिषद् अस्तित्वात आल्या नंतर ठाणे व पालघरमध्ये किती अधिकारी, कर्मचारी असावेत हे शासन पातळीवर निश्चित करण्यात आले होते. त्यातील बिंदु नामावली नुसार ठाणे जिल्ह्यातील ४७९ अधिकारी, कर्मचाऱ्यांची पालघर मध्ये बदल्या करण्याचे आदेश निघाले होते.परंतु पालघर मध्ये जाणे गैरसोयीचे असल्याचे कारण सांगून हया कर्मचाऱ्यांनी पालघर मध्ये जाण्यास नकार दिला होता.
या बाबत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री,आयुक्त पातळीवर बैठकाही झाल्या आहेत.त्या नुसार ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा परिषदेमध्ये वर्ग झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी रुजू झालेच पाहिजे असे आदेश निघाल्याचेही समजते. मात्र अजूनही हे कर्मचारी स्वेच्छा निवृती घेण्याच्या धमक्या देत रुजू होण्याबाबत चालढकल करीत आहेत.
शासकीय यंत्रणांनी जलद काम करावे असे अपेक्षीत असतांना बालविकास प्रकल्प,महिला बालविकास, समाजकल्याण, पाणीपुरवठा इ.महत्वपूर्ण विभागाच्या ४७९ पैकी ३५९ कर्मचाऱ्यांची आॅर्डर निघून ही ते पालघरमध्ये रुजू होण्यास तयार नाहीत असे त्यांनी सांगितले.
>खासदारांच्या दबावामुळे घडले सारे?
खासदार कपिल पाटील यांच्या दबावामुळे ठाणे जि.प. कर्मचाऱ्यांना सोडत नाही. तसेच पालक मंत्री विष्णू सवरा आणि जि.प.अध्यक्ष सुरेखा थेतले यांच्या धरसोड प्रवृतीमुळे हे घडत असल्याचे त्यानी लोकमतशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हया प्रकरणात लक्ष घालावे आणि दोन वर्षापासून भिजत पडलेला हा प्रश्न निकालात काढावा. येत्या १५ दिवसात कर्मचारी पालघरमध्ये कामावर हजर झाले नाहीत तर सेना जिल्हा प्रमुख,जि.प.उपाध्यक्ष,गटनेते यांच्या सह शिवसेना स्टाइल ने आंदोलन उभारण्याचा इशारा ही निकम यांनी दिला आहे.