झी समूह 'जिंदगी'वरील पाकिस्तानी मालिका करणार बॅन
By Admin | Published: September 24, 2016 12:16 PM2016-09-24T12:16:11+5:302016-09-24T12:27:38+5:30
झी समूह जिंदगी चॅनेलवरील पाकिस्तानी मालिका बॅन करण्याच्या विचारात असल्याचे झी समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्र गोयल यांनी सांगितले.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - गेल्या आठवड्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील उरी येथे केलेल्या हल्ल्यात १८ जवानांना प्राण गमवावे लागल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना, मनसे सारख्या राजकीय पक्षांनीही पाकिस्तानवर कारवाई करण्याची तसेच पाकिस्तानी कलाकार, खेळाडूंना देशाबाहेर घालवण्याची मागणी केली असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तान कोंडीत सापडताना दिसत आहे. मनसेने तर शुक्रवारी पाकिस्तानी कलाकारांना ४८ तासांत भारत सोडून पाकिस्तानात जाण्याचा इशारा दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माध्यम क्षेत्रातील आघाडीचा समूह असलेल्या ' झी'नेही पाकिस्तानी कलाकार व मालिकांवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. 'झी' व ' एस्सेल' समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्र गोयल यांनी शनिवारी सकाळी स्वत:च ट्विटरवरून ही माहिती दिली.
' पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्तराष्ट्रांच्या सभेत भारताविरुद्ध घेतलेली भूमिका दुर्दैवी असल्याचे सांगत झी समूह जिंदगी (चॅनेलवरील) पाकिस्तांनी कार्यक्रमांवर बंदी घालण्याच्या विचारात असल्याचे' गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 'तसेच पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जायला हवे,' असेही त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या या भूमिकेचे सोशल मीडियावरही स्वागत होत आहे.
'काश्मीरमध्ये भारताकडून मानवाधिकांराचं उल्लंघन होत असून, तेथील जनतेवर अत्याचार केले जात आहेत. काश्मीरमधील नव्या पिढीला स्वातंत्र्य हवं आहे', असे सांगत नवाज शरीफ यांनी भारतविरोधी राग आळवला आहे. तसेच ' . काश्मीर प्रश्नाची सोडवणूक केल्याशिवाय भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता आणि सामान्य स्थिती प्रस्थापित केली जाऊ शकत नाही', असे सांगतानाचत्यांनी काश्मीर खोऱ्यात सध्या सुरू असलेली आंदोलने आणि अशांततेबद्दल भारतावर आरोप केले. ८ जुलै रोजी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या बुऱ्हान वनीचा उल्लेख तर शरीफ यांनी युवा नेता असा केला होता.unfortunate stance of Mia Sharif at UN. Zee is considering stopping Zindgi programs from Pak,as well artists from there should leave
— Dr. Subhash Chandra (@subhashchandra) September 24, 2016
झी जिंदगीवर सध्या ‘बिन तेरे’, ‘एक तमन्ना लहसील सी’, ‘फात्मागुल’, ‘मै हरी पिया’ या मालिका प्रसारित होतात. दोन वर्षांपूर्वी ‘जिंदगी गुलजार है’ ही अभिनेता फवाद खानची मुख्य भूमिका असलेली मालिका प्रचंड गाजली होती.
भारतात राजकीय पक्षांनी यापूर्वीही पाकिस्तानी कलाकार, गायक, खेळाडू यांना विरोध दर्शवला आहे.