कॅल्क्युलेटरपेक्षाही वेगवान गणितातील जीनिअस!, चौथीतील ऋतुराजचे दोन जागतिक विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 02:38 AM2018-01-15T02:38:12+5:302018-01-15T02:38:17+5:30
चौथीतील ऋतुराज बाळासाहेब पवार याने कॅल्क्युलेटरपेक्षाही अधिक वेगवान पद्धतीने गणित सोडवत दोन जागतिक विक्रम केले आहेत. त्याला नुकतेच राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आले.
राम शिनगारे/मयूर देवकर
औरंगाबाद : चौथीतील ऋतुराज बाळासाहेब पवार याने कॅल्क्युलेटरपेक्षाही अधिक वेगवान पद्धतीने गणित सोडवत दोन जागतिक विक्रम केले आहेत. त्याला नुकतेच राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आले.
येथील केम्ब्रिज शाळेतील ऋतुराजला आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘मॅथ्स जीनिअस वर्ल्ड रेकॉर्डस् अँड अवॉर्डस्’ संस्थेतर्फे, राष्ट्रीय गणित दिनानिमित्त ‘मॅथ्स जीनिअस वर्ल्ड रेकॉर्ड’ आणि ‘एक्सलन्स इन मॅथेमॅटिक्स’ पुरस्कारांनी हैदराबादमध्ये सन्मानित केले.
त्याने पहिल्या विक्रमासाठी अंकांची दुप्पट करताना, १ पासून सुरुवात करून अंतिम उत्तर १४० लाख करोड म्हणजेच १५ अंकी आकड्यात दिले. हा विक्रम त्याने २ मिनिटे आणि २८ सेकंदांत पूर्ण केला.
ही गणिते सोडविताना त्याने कुठलाही कागद वा पेनचा वापर केला नाही. दुसºया विक्रमात त्याने ‘मॅजिक आॅफ १०००’ हा
अंक गणितातील नवीनच प्रयोग केवळ ३ मिनिटे ८ सेकंदांत सादर केला.
अनेक विक्रमांसाठी नोंदणी
ऋतुराजच्या अफलातून बुद्धिमत्तेची एशिया बुक, लिम्का बुकने नोंद घेतली आहे.
दोन्ही संस्थांचे पदाधिकारी लवकरच ऋतुराजची उलट तपासणी घेणार असल्याचे त्याचे वडील डॉ. बाळासाहेब पवार यांनी सांगितले.
एका आॅनलाइन परीक्षेत त्याने २० गणिते केवळ ३० सेकंद ५९ मायक्रो सेकंदांत सोडविली.
गणिती पाढे मुखोद्गत
शाळेमध्ये १ ते ३० पर्यंतचे पाढे शिकविले जातात. ते केवळ १० अंकांपर्यंतच म्हटले जातात. मात्र, ऋतुराजला ७१ अंकांपर्यंतची पाढे १० पर्यंतच नव्हेत, तर १ हजार अंकांपर्यंत मुखोद्गत आहेत. डोळे बंद करून तो प्रश्न बारकाईने ऐकतो.
ऋतुराजला लहानपणापासून अंकगणितामध्ये आवड आहे. त्याला शिक्षिका श्वेता दायमा आणि त्याची आई वर्षा पवार यांनी मार्गदर्शन केले आहे. त्याला आम्ही अधिक प्रोत्साहन देत आहोत.
- डॉ. बाळासाहेब पवार,
ऋतुराजचे वडील.