नागपूर जिल्हा परिषद निवडणुक: गृहमंत्री देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 02:32 PM2020-01-08T14:32:53+5:302020-01-08T14:38:46+5:30
Nagpur ZP Election 2020 : जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
नागपूर: पालघर, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सहा जिल्ह्यांत काल झालेल्या मतदानानंतर आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली आहे. सर्वच जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाले आहेत.
सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. सलील देशमुख हे नागपुरातील मेटपांजरा गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर जिल्हा परिषदेची ही त्यांची पहिलीच निवडणूक होती. विशेष म्हणजे या आधी पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी सलील हे इच्छुक होते. मात्र त्यावेळी त्यांना संधी मिळाली नव्हती.
जिल्हा परिषदेच्या निकालावरून अनेक ठिकाणी भाजपला त्यांच्याच बालेकिल्ल्यात धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. नागपूरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धक्का बसला असून, गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. तर माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी जिल्हा परिषद सर्कलमधून काँग्रेसचे उमेदवार नाना कंभाले विजयी झालेत.