झेडपी निवडणूक : कमी जागा; तरी भाजप...नागपुरात काँग्रेस, अकोल्यात वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 09:31 AM2022-10-18T09:31:57+5:302022-10-18T09:32:39+5:30
ठाण्यात शिंदे गटाचं वर्चस्व, तर रायगडमध्ये हादरा... महाविकास आघाडीला यश
राज्यात सोमवारी नंदुरबार, अकोला आणि नागपूर या तीन जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी निवडणुका पार पडल्या. राज्यात भाजप व बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांची युती असताना नंदुरबार जिल्ह्यात मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळाले. अध्यक्ष उपाध्यक्षपदी भाजपचे उमेदवार विजयी झाले. राज्यातील सत्तांतरानंतर ही पहिली घटना असल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आहे. अकोला येथे अपेक्षेप्रमाणे वंचित बहुजन आघाडीने विजय मिळविला. नागपुरात बंडखोरी झाली तरी, सत्ता कायम राखण्यात काँग्रेस यशस्वी ठरली आहे.
अध्यक्षपदी भाजपच्या सुप्रिया गावित
नंदुरबार जिल्हा परिषदेत अतिशय नाट्यमय घडामोडीनंतर अध्यक्षपदी भाजपच्या डॉ.सुप्रिया विजयकुमार गावित तर उपाध्यक्षपदी सुहास नाईक हे विजयी झाले. विद्यमान अध्यक्षा ॲड.सीमा वळवी व उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांचा सहा मतांनी पराभव झाला.
नंदुरबार जिल्हा परिषदेत एकूण ५६ सदस्य असून, त्यात काँग्रेसचे २४, भाजप २०, शिवसेना आठ आणि राष्ट्रवादीचे चार असे सदस्य आहेत. सुरुवातीच्या अडीचवर्षे शिवसेना आणि काँग्रेसची युती झाल्याने सत्ता काँग्रेसकडे होती. अडीच वर्षानंतर अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनाचे दोन तथा काँग्रेसचे चार सदस्यांंनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपच्या डाॅ.सुप्रिया गावित या अध्यक्षपदी विजयी झाल्या.
नागपुरात बंडखोरी, तरी काँग्रेसने सत्ता राखली
- नागपूर जि. प. अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने भरपूर जोर लावला. काँग्रेसला धक्का देवून सत्तापलट होईल असा कयासही लावला जात होता. काँग्रेसमध्ये नाराजीतून बंडखोरीही झाली. या बंडखोरीतून भाजपाला डाव साधता आला नाही. अखेर काँग्रेसने अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणुकीत विजय मिळवित सत्ता कायम राखली. पाटनसावंगी सर्कलच्या मुक्ता कोकड्डे या ३९ मते मिळवित अध्यक्ष म्हणून तर गोधनी सर्कलच्या कुंदा राऊत या ३८ मते मिळवून उपाध्यक्षपदी विजयी झाल्या.
- जिल्हा परिषदेच्या परिसरात अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून सोमवारी सकाळपासूनच रंगतदार घडामोडी घडल्या. मुक्ता कोकड्डे यांना काँग्रेसच्या २८, राष्ट्रवादीच्या ८, शेकाप १, गोगपा १ व एका अपक्ष सदस्यांनी मतदान केले. तर प्रितम कवरे यांना भाजपाच्या १४ काँग्रेस बंडखोर ३ व शिवसेनेच्या एका सदस्याने मतदान केले.
अकोल्यात ‘वंचित’चेच फटाके
अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदांच्या निवडणुकीत वर्चस्व राखत वंचित बहुजन आघाडीने सोमवारी विजय मिळविला. अध्यक्षपदी संगीता अढाऊ व उपाध्यक्षपदी सुनील फाटकर विजयी झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेत दिवाळीपूर्वीच ‘वंचित’च्या विजयाचे फटाके फुटले असून, महाविकास आघाडीचा फज्जा उडाला. सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीला २५, तर विरोधकांना २३ मते मिळाली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, प्रहार जनशक्ती पक्ष आणि दोन अपक्ष मिळून महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला.
रायगड : शिंदे गट, शेकापला हादरा; महाविकास आघाडीला यश
अलिबाग : राज्यातील सत्तांतरानंतर रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा झालेल्या ग्रामपंचायत समितीच्या निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना धक्के बसले असून, एकनाथ शिंदे गटाला अलिबाग वगळता अन्यत्र पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासह महाविकास आघाडीने अनपेक्षितपणे बाजी मारली आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार भरत गोगावले यांना आपल्या गावातील ग्रामपंचायत राखता आली नाही. तर शेतकरी कामगार पक्षाला अलिबागमधील मक्तेदारीला चाप बसला आहे. १६ ग्रामपंचायतींपैकी महाविकास आघाडीने ६, स्थानिक आघाड्यांना ४, शिंदे गटाला ३, भाजपला २ व शेकापला एका ठिकाणी सरपंचपद मिळाले आहे. ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर एका ठिकाणी नागरिकांनी बहिष्कार टाकल्याने ती रद्द झाली.
सर्वाधिक उत्सुकता महाड तालुक्यातील काळीज खरवली ग्रामपंचायत निवडणुकीची होती. शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार गोगावले यांचे या ग्रामपंचायतीवर वर्चस्व होते. मात्र महाविकास आघाडीमार्फत उभे असलेल्या काँग्रेसच्या चैतन्य म्हामुणकर यांनी तेथून विजय मिळविला. अलिबाग तालुक्यातील वेश्वी व नवेदर नवगाव येथे शेकापला धक्का बसला. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी व राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांच्या गटाने काँग्रेसला सोबत घेत येथे निवडणूक लढवली होती. तर शेकाप व उद्धव ठाकरे गट एकत्र होते. त्यांचे दोन्ही ठिकाणी १३ सदस्य निवडून आले असले तरी सरपंचपदावर विरोधकांनी बाजी मारली.
ठाणे : शिवसेनेच्या शिंदे गटाची बाजी
ठाणे : राज्यभराचे लक्ष लागलेल्या ठाणे जिल्ह्यातील १५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटांमुळे चुरस निर्माण झाली होती. यामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेने (शिंदे गट) ५६ जागांवर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ४४ ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे, तर महाविकास आघाडीने २५, भाजप १९ आणि इतरांनी नऊ जागांवर विजय मिळविल्याचा दावा केला आहे.
१८ ग्रामपंचायती बिनविराेध झाल्या, तर पाच ग्रामपंचायतींत निवडणुका हाेऊ शकल्या नाहीत. १३४ ग्रामपंचायतींत ११९ सरपंचपदांसाठी व ८५५ सदस्यांसाठी रविवारी मतदान झाले. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे ठाणे ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील यांनी ५६ ग्रामपंचायतींवर विजय मिळवल्याचा दावा केला. यात शहापूरला २९, तर मुरबाडला १५ आणि भिवंडीला श्रमजीवीला सोबत घेऊन १३ जागांवर विजय मिळविल्याचे त्यांनी सांगितले, तर भिवंडी, शहापूरला शिवसेनेच्या ठाकरे गटाने ४४ जागांवर विजय मिळविल्याचा दावा केला आहे.
भाजपला मुरबाड, भिवंडी आणि अंबरनाथच्या एका ग्रामपंचायतीसह १९ जागा मिळाल्याची माहिती मिळाली आहे. या विषयी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी निकालाची आकडेवारी हाती आली नसल्याचे सांगितले. महाविकास आघाडीला २५ ग्रामपंचायती मिळाल्या असून, यात शहापूर आणि कल्याण येथील ग्रामपंचायतीचा समावेश आहे. भिवंडीत मनसेला दोन जागा मिळाल्या आहेत. उर्वरित ७ ग्रामपंचायतींवर इतरांचे वर्चस्व आहे.