लोकसभा निवडणूक लढविणे जिल्हा परिषदेच्या अभियंत्याला भोवले; निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 07:33 PM2019-04-03T19:33:51+5:302019-04-03T19:34:24+5:30
नंदकिशोर मोरे हे अमरावती जिल्हा परिषदेच्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा विभागात कनिष्ठ अभियंता आहेत.
अमरावती : जिल्हा परिषदेचे कनिष्ठ अभियंता नंदकिशोर रामाजी सागर (मोरे) यांनी वर्धालोकसभा मतदारसंघातून बहुजन सेना पुरस्कृत म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. मोरे हे परवानगी न घेता निवडणूक लढवित असल्याने त्यांच्यावर बुधवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री यांनी निलंबनाचे आदेश निर्गमित केले.
नंदकिशोर मोरे हे अमरावती जिल्हा परिषदेच्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा विभागात कनिष्ठ अभियंता आहेत. त्यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (वर्तणूक) नियम १९६७ चे नियम (४) नुसार निवडणुकीमध्ये सहभाग घेता येत नाही. तथापि, मोरे यांनी वर्धालोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे पुरावे प्रशासनाच्या हाती लागले आहेत. त्यामुळे सीईओ खत्री यांनी मोरे यांचे निलंबन करताना मुख्यालय धारणी येथील जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग ठेवले आहे. निलंबनकाळात महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयत्तर सेवा, निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे) या काळातील प्रदान (१९८१) मधील नियम ६८ नुसार निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहील.
मोरे यांचा निर्वाह भत्ता जिल्हा परिषदेचा यांत्रिकी उपविभाग येथून काढण्यात येणार आहे. मोरे यांना खासगी नोकरी किंवा खासगी व्यवसाय करीत नसल्याचे प्रमाणपत्र दरमहा सादर करावे लागणार असल्याचे सीईओ खत्री यांनी आदेशात म्हटले आहे.
भूजल सर्वेक्षण विभागात कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) पदावर कार्यरत असताना, परवानगी न घेता मोरे हे निवडणूक लढवित असल्याप्रकरणी त्यांच्यावर बुधवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली.
- मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
लोकशाहीमध्ये मतदानाचा सर्वांना अधिकार आहे तसाच निवडणूक लढण्याचाही आहे. मी निवडणूक लढविण्यासाठी रीतसर परवानगी प्रशासनाकडे मागितली आहे. परंतु, ती नाकारण्यात आली.
नंदकिशोर सागर ( मोरे)