जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ महाविद्यालयांना मिळणार प्राध्यापक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2016 04:01 PM2016-12-25T16:01:31+5:302016-12-25T16:01:31+5:30
जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत.
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 25 - जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. एकूण पाच महाविद्यालयांत १९ प्राध्यापक नियुक्त केले जाणार आहे. वाशिम जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, कामरगाव, उंबर्डा बाजार, विठोली येथे जिल्हा परिषदेचे कनिष्ठ महाविद्यालय आहे.
या महाविद्यालयांत प्राध्यापकांची रिक्त पदे असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान, या संदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी मुद्दा उपस्थित करून रिक्त पदे भरण्याची मागणी केली होती. यासंदर्भात लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्नही केला.
जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी रिक्त पदांचा तिढा सोडविण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. प्राथमिक शिक्षणाधिकारी डी.एच. जुमनाके यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनात घड्याळी तासिकेवर प्राध्यापकांची तात्पुरती नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वाशिम, मंगरूळपीर, कामरगाव, उंबर्डा बाजार, विठोली येथे जिल्हा परिषदेचे कनिष्ठ महाविद्यालयांना लवकरच प्राध्यापक मिळणार आहेत. भौतिकशास्त्र व जीवशास्त्र विषयाचे प्रत्येकी चार प्राध्यापक, गणित विषयाचे दोन, रसायनशास्त्र विषयाचे तीन, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र विषयाचे प्रत्येकी दोन, इतिहास व इंग्रजी विषयाचे प्रत्येकी एक असे एकूण १९ प्राध्यापकांची पदे घड्याळी तासिकेनुसार भरली जाणार आहेत.