जिल्हा परिषदांमध्ये ‘मत’लबी आघाड्या!
By admin | Published: March 22, 2017 02:30 AM2017-03-22T02:30:26+5:302017-03-22T02:30:35+5:30
राज्यातील पंचवीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीत सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या सोयीनुसार
मुंबई : राज्यातील पंचवीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीत सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या सोयीनुसार मतलबी आघाडी/युती करून सत्ता हस्तगत केली. महिनाभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध दंड थोपटून मैदानात उतरलेल्या राजकीय नेत्यांनी स्वत:च्या मतदारसंघातील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन पक्षाच्या ध्येय-धोरणाला तिलांजली देत सत्तेचे गणित जुळविले. त्यामुळे कुठे काँग्रेस-भाजप, कॉंग्रेस-शिवसेना, तर कुठे राष्ट्रवादी-भाजप, शिवसेना-राष्ट्रवादी अशा आघाड्या झाल्याने राज्याच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.
नातेवाईकांचे चांगभले!-मुंबई : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडणुकीतही नातलगशाही दिसून आली. सत्तेचे गणित जुळविताना नेत्यांनी नातलगांना खुर्चीवर बसविले.
विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर हे सातारा जिपचे अध्यक्ष झाले. कोल्हापूर जिपच्या अध्यक्ष शौमिका महाडिक या भाजपा आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आहेत.
संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची पुतणी व दिवंगत खासदार साहेबराव डोणगावकर पाटील यांच्या सून देवयानी डोणगावकर या औरंगाबादला जि. प. अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. जालन्याचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर हे सेनेचे राज्यमंत्री अर्जून खोतकर यांचे पुत्र आहेत. तेथे उपाध्यक्ष झालेले सतीश टोपे हे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांचे चुलत बंधु आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष नयना गावित या काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांच्या कन्या व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांच्या नात आहेत. अहमदनगरच्या अध्यक्ष शालिनी विखे पाटील या विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी आहेत. तर उपाध्यक्ष राजश्री घुले या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या पत्नी आहेत. रायगडच्या अध्यक्ष अदिती तटकरे या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. (विशेष प्रतिनिधी)
जिल्हा परिषद अध्यक्षांचा ‘एस’ क्लब-
कोल्हापूर : राज्यातील २५ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड मंगळवारी मोठ्या उत्साहात झाली. या निवडीत प्रत्येक ठिकाणी युती-आघाडीची नवनवीन खिचडी शिजली असली तरी एक गोष्ट मात्र काही ठिकाणी समान आहे. ती म्हणजे, १० ठिकाणच्या अध्यक्षांच्या नावाची सुरुवात इंग्रजीतील ‘एस’ आद्याक्षराने होत आहे. अर्थात हा एक योगायोग आहे.
कोल्हापुरात शौमिका महाडिक, सांगलीत संग्रामसिंह देशमुख, साताऱ्यात संजीवराजे नाईक-निंबाळकर , सोलापुरात संजय शिंदे, रत्नागिरीत स्नेहा सावंत, नांदेडमध्ये शांताबाई पवार, अहमदनगरमध्ये शालिनी विखे-पाटील, नाशिकमध्ये शीतल सांगळे, हिंगोलीमध्ये शिवराणी नरवाडे, बीडमध्ये सविता गोल्हार यांचा समावेश आहे. हे सर्वजण एस क्लबमधीलच आहेत.
विशेष म्हणजे, राज्यातील सहा जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या नावाची सुरुवातही ‘एस’ अक्षराने होत आहे. यामध्ये सर्जेराव पाटील (कोल्हापूर), सुहास बाबर (सांगली), संतोष थेराडे (रत्नागिरी), शिवानंद पाटील (सोलापूर), सतीश टोपे (जालना), समाधान जाधव (नांदेड) यांचा समावेश आहे.
डोणगावकर कुटुंब
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांचे पती कृष्णा पाटील हे जिल्हा परिषद सदस्य होते. सासरे व माजी खा. दिवंगत साहेबराव पाटील डोणगावकर हे देखील जि.प. अध्यक्ष होते. त्यांच्या सासूबाई इंदूमतीताई या उपाध्यक्षा होत्या. त्यांचे आजे सासरे कचरू पाटील हे लोकल बोर्डाचे सदस्य होते. देवयानी यांचे आजोबा रामराव पाटील भामरे हे धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. वडील सुरेश भामरे हे धुळे जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष होते. आई मंगला या सदस्या होत्या.
राष्ट्रवादीचे दुसरे नेते माजी खासदार पद्मसिंह पाटील यांची सून आणि आमदार राणा जगजितिसंग यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील या उस्मानाबादच्या उपाध्यक्षा झाल्या आहेत. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक यांना पुणे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी संधी मिळाली. सांगलीत माजी आमदार दिवंगत संपतराव देशमुख यांचे चिरंजीव संग्रामसिंह देशमुख यांना लाल दिव्याची गाडी मिळाली. येथे शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास हे उपाध्यक्ष झाले. सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू संजय शिंदे हे अध्यक्षपदी विराजमान झाले. नांदेडमध्ये माजी आमदार व जि.प.चे माजी अध्यक्ष माधव जवळगावकर यांच्या आई शांताबाई जवळगावकर अध्यक्षा झाल्या.