जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा पुढीलवर्षीपासून राज्यस्तरावर होणार, ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा
By नितीन काळेल | Updated: January 10, 2025 15:37 IST2025-01-10T15:36:13+5:302025-01-10T15:37:26+5:30
साताऱ्यात स्पर्धेचे उद्घाटन; सांघिक भावना वाढीस मदत

जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा पुढीलवर्षीपासून राज्यस्तरावर होणार, ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा
सातारा : खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते. त्यामुळे पोलिस आणि महसूल विभागाप्रमाणेच पुढीलवर्षीपासून जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा विभाग आणि राज्यस्तरावरही सुरू करण्यात येतील, अशी महत्वपूर्ण घोषणा ग्रामविकास मंत्रीजयकुमार गोरे यांनी केली.
सातारा येथे जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा परिषद वार्षिक क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री गोरे यांनी ही घोषणा केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांच्यासह अधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.
मंत्री गोरे म्हणाले, सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा होत आहेत. यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी अशा सर्व घटकांना संधी मिळालेली आहे. त्यामुळे सर्वजण एक भावनेने स्पर्धेत सहभागी झाले असून उत्साहही दिसत आहे. स्पर्धेचे चांगले नियोजनही झाले आहे. क्रीडा स्पर्धांमुळे शारीरिकरित्या आपण मजबूत होतो. त्यामुळेच मानसिकरित्याही खंबीर होण्याने संकटाशी सामना करता येतो. जिल्हा परिषदेच्या या स्पर्धा आता जिल्हास्तरावर होत आहेत. पण, पुढील वर्षीपासून विभाग आणि राज्यपातळीवर घेण्यात येतील.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. त्यामुळे जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणतात. आपण सर्वजण सातारा जिल्हा विकासात आणखी पुढे घेऊन जाऊया. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांचा कार्यक्रम दिला आहे. यामध्येही सातारा पुढे राहील, असा संकल्प करुया, असे आवाहनही मंत्री गोरे यांनी यावेळी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन म्हणाल्या, सातारा जिल्हा परिषदेची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी यंत्रणा आहे. या स्पर्धेत सर्वांचा सहभाग आहे. विविध १७ क्रीडा प्रकाराबरोबच सांस्कृतिक महोत्सवही होत आहे. या स्पर्धेत सर्वांनीच मनापासून खेळावे आणि शिस्त बाळगावी.
क्रीडा ज्योत प्रज्वलीत अन् चित्ररथ..
या स्पर्धेच्या निमित्ताने प्रथम ग्रामविकास मंत्री गोरे यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलीत करण्यात आली. त्यानंतर स्पर्धेचे उदघाटन झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद मुख्यालय आणि ११ पंचायत समितीच्या संघानी ओळख करुन दिली. त्यानंतर १२ चित्ररथ निघाले. वैविध्यपूर्ण असणाऱ्या या चित्ररथाचे सर्वांनीच स्वागत केले.