जिल्हा परिषदेत आघाडीची सरशी!

By admin | Published: September 22, 2014 02:15 AM2014-09-22T02:15:39+5:302014-09-22T02:15:39+5:30

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली

Zilla Parishad top Sarasi! | जिल्हा परिषदेत आघाडीची सरशी!

जिल्हा परिषदेत आघाडीची सरशी!

Next

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली. मराठवाड्यात काँग्रेस वरचढ ठरली तर विदर्भात काही फेरबदल झाले. अहमदनगरसह काही जिल्हा परिषदेत आघाडीने युतीकडून सत्ता हिसकावून घेतली.
औरंगाबादेत काँग्रेसचे श्रीराम नागोराव महाजन (अध्यक्ष), राष्ट्रवादीचे दिनकर नरसिंहराव पवार (उपाध्यक्ष) विजयी झाले. उस्मानाबादमध्ये काँगे्रसचे धिरज पाटील व सुधाकर गुंड अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष झाले. हिंगोलीत शिवसेनेनेच बाजी मारली. अध्यक्षपदी लक्ष्मीबाई यशवंते तर उपाध्यक्षपदी राजेश्वर पतंगे यांची निवड झाली. नांदेडमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्षपदी अनुक्रमे काँग्रेसच्या मंगला गुंडीले आणि राष्ट्रवादीचे दिलीप धोंडगे यांची निवड झाली. परभणीत राष्ट्रवादीचे राजेश विटेकर व राजेंद्र लहाने यांची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली़ जालना येथे अध्यक्षपदी भाजपाचे तुकाराम जाधव तर उपाध्यक्षपदी अनिरुद्ध खोतकर विजयी झाले. लातूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील कव्हेकर अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी अण्णासाहेब पाटील यांची निवड झाली़
रायगडमध्ये राष्ट्रवादी-शेकाप
रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापने बाजी मारली. अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुरेश टोकरे यांची तर उपाध्यक्षपदी शेकापचे अरविंद म्हात्रे यांची निवड झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शेकापचे सर्वेसर्वा जयंत पाटील यांचे डावपेच यशस्वी झाल्याचेच स्पष्ट होत आहे.
उत्तर महाराष्ट्रात संमिश्र चित्र
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या मंजुषा गुंड व काँग्रेसचे अण्णासाहेब शेलार अविरोध अध्यक्ष-उपाध्यक्ष झाले. पहिल्या अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादी आणि सेना-भाजपा सत्तेत होती. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे विजयश्री चुंबळे व प्रकाश वडजे यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षपद मिळविले. शिवसेना-भाजपा अलिप्त राहिले. जळगावमध्ये भाजपाचे प्रयाग कोळी (अध्यक्ष) व शिवसेनेचे ज्ञानेश्वर आमले (उपाध्यक्ष) बिनविरोध निवडूण आले. काँग्रेस व राष्ट्रवादीने निवडणुकीतून माघार घेतली.
अमरावती, वर्धा, यवतमाळमध्ये फेरबदल
नागपूरमध्ये अध्यक्षपदी भाजपाच्या निशा सावरकर तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे शरद डोनेकर यांची निवड झाली. अमरावतीमध्ये काँग्रेसचे सतीश उईके अध्यक्ष तर, वऱ्हाड विचार मंचचे सतीश हाडोळे उपाध्यक्षपदी अविरोध निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच सदस्यांनी बंडखोरी करुन स्वतंत्र वऱ्हाड विचार मंच स्थापन केल्याने राष्ट्रवादीला जबर धक्का बसला. सदस्यांची पळवापळवी करून वर्धेत भाजपाने काँग्रेसकडून सत्ता हिसकाविली. अध्यक्षपदी भाजपाच्या चित्रा रणनवरे तर उपाध्यक्षपदी भाजपाच्याच विलास कांबळे यांचा विजय झाला. यवतमाळमध्ये राष्ट्रवादीच्या डॉ. आरती फुफाटे अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांची निवड करण्यात आली. चंद्रपुरात भाजपाच्या संध्या गुरनुले व कल्पना बोरकर अध्यक्ष-उपाध्यक्ष झाल्या. गडचिरोलीत राष्ट्रवादीचे परशुराम कुत्तरमारे तर काँग्रेसचे जीवन पाटील अध्यक्ष-उपाध्यक्ष झाले.बुलडाण्यात काँग्रेसच्या अलका चित्रांगण खंडारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग खेडेकर अध्यक्ष-उपाध्यक्ष झाले.
पुण्यात राष्ट्रवादी
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप विद्याधर कंद (लोणीकंद) यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचेच शुक्राचार्य हिरामण वांजळे (अहिरे) यांची बिनविरोध निवड झाली.
दक्षिणेत आघाडी
साताऱ्यात अध्यक्षपदी माणिकराव सोनवलकर, तर उपाध्यक्षपदी प्रदीप ऊर्फ रवी साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली. दोघेही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. सांगलीत राष्ट्रवादीच्या रेश्माक्का होर्तीकर, लिंबाजी पाटील यांची अध्यक्ष-उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विलासराव जगताप यांना शह देण्यासाठीच दुष्काळी जत तालुक्याला अध्यक्षपदाची संधी दिल्याचे म्हटले जाते. राष्ट्रवादीने आघाडीचा प्रस्ताव तूर्त नाकारल्याने काँग्रेसने या निवडणुकीत तटस्थ राहणे पसंत केले. कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या विमल पुंडलिक पाटील (आमशी) अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी शशिकांत खोत (कणेरी) बिनविरोध निवडूण आल्या.
रत्नागिरीत युती
रत्नागिरीत अध्यक्षपदी शिवसेनेचे जगदीश राजापकर यांची, तर उपाध्यक्षपदी भाजपाचे सतीश शेवडे यांची अपेक्षितपणे बिनविरोध निवड झाली़ यापूर्वी अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असल्याने राष्ट्रवादीच्या मनीषा जाधव यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली होती. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापने बाजी मारली. अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुरेश टोकरे यांची तर उपाध्यक्षपदी शेकापचे अरविंद म्हात्रे यांची निवड झाली. सिंधुदुर्गमध्ये काँग्रेसचे संदेश सावंत, रणजित देसाई यांची अध्यक्ष-उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. विरोधी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला.
सोलापूरमध्ये राष्ट्रवादी
सोलापूरमध्ये जयमाला गायकवाड व शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख यांची अध्यक्ष-उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली़ खा़ विजयसिंह मोहिते-पाटील, पालकमंत्री दिलीप सोपल, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी मंत्री सुधाकर परिचारक आदी राष्ट्रवादी नेत्यांनी एकजूट दाखविली. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Zilla Parishad top Sarasi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.